जिला

सीईओ महेश पाटील यांचा हदगाव व अर्धापूर तालुक्यांचा दौरा; विकास कामांचा आढावा

पाटनूर, लोणी येथे प्रत्यक्ष भेट देत योजनांची पाहणी

 

नांदेड,१३- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी बुधवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी हदगाव व अर्धापूर तालुक्यांचा दौरा करून विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूरकुमार आंदेलवाड, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, हादगावचे गटविकास अधिकारी डी. के. आडेराघो तसेच अर्धापूरचे गटविकास अधिकारी यू. डी. तोटवाड उपस्थित होते.

हादगाव पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी प्रधानमंत्री आवास योजना, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान, व्हीबी-जी- रामजी, रामाई योजना, ग्रामपंचायत विभाग, आरोग्य, शिक्षण, बांधकाम, जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशनसह विविध विकास योजनांचा विभागनिहाय आढावा घेतला.

यावेळी त्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. १५ ऑगस्ट रोजी गावस्तरावर होणाऱ्या ग्रामसभेत शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना द्यावी, घरकुल योजनांच्या अंतिम याद्या ग्रामसभेत वाचून दाखवाव्यात तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार घनकचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करून कचऱ्याचे विलगीकरण प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

सोळाव्या वित्त आयोगांतर्गत आवश्यक विकास आराखडे वेळेत तयार करून निधीची तरतूद करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच लेखापरीक्षण वेळेत पूर्ण करणे, कर्मचाऱ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीद्वारे घेणे तसेच विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीत गती आणण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

यानंतर अर्धापूर पंचायत समिती येथे सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत घरकुल योजनेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अंगणवाडी विकासासाठी वित्त आयोगाच्या दहा टक्के निधीतून आवश्यक तरतूद करण्याच्या सूचनांसह विविध विभागांच्या कामांचा आढावाही मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी घेतला. या बैठकीत गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, कृषी अधिकारी, उप अभियंता, संबंधित विभागाचे विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी आदींची उपस्थिती होती.

 

विद्यार्थ्यांशी हितगुज

अर्धापूर तालुक्याच्या दौऱ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी पाटनूर ग्रामपंचायत तसेच लोणी खुर्द व लोणी बुद्रुक या गावांना भेट दिली. येथे त्यांनी घनकचरा व्यवस्थापनासाठी उभारण्यात आलेल्या सेग्रिगेशन शेडची पाहणी केली. घरकुल लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच अंगणवाडीला भेट देत चिमुकल्यांशी मनमोकळा संवाद साधला. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज केले आणि शैक्षणिक गुणवत्ता अधिक वृद्धिंगत करण्यासाठी शिक्षकांना आवश्यक मार्गदर्शन केले.

 

घरकुलासाठी सिमेंटच्या विटांचा वापर; खर्चात बचत

अर्धापूर तालुक्यातील पाटनूर येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्या नागेश भगवान बि-हाडे यांचेशी मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी संवाद साधला. यावेळी लाभार्थ्यांनी घर बांधकामासाठी पारंपरिक भाजलेल्या विटांऐवजी सिमेंटच्या विटांचा वापर केल्याची माहिती दिली. त्यामुळे सिमेंट व वाळूची बचत झाली, सिमेंटच्या विटा तुलनेने स्वस्त असून जवळच्या बाजारात सहज उपलब्ध होतात. वाहतूक खर्चही कमी येत असल्याने एकूण बांधकाम खर्चात बचत झाली आणि घर उभारताना कोणत्याही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला नाही, असे लाभार्थ्यांनी सांगितले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *