नांदेड रजिस्ट्री कार्यालयातील अनधिकृत दलालांचा सुळसुळाट थांबवा; पारदर्शक कारभारासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नांदेड : नांदेड शहरातील दुय्यम निबंधक (रजिस्ट्री) कार्यालयांमध्ये मालमत्ता खरेदी-विक्री, दस्त नोंदणी व इतर कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. मात्र, कार्यालय परिसरात अनधिकृत दलालांचा वावर असल्याने नागरिकांना शासकीय प्रक्रिया समजून घेण्यासाठी तसेच आपली कामे करून घेण्यासाठी मध्यस्थांवर अवलंबून राहावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शासनाच्या पारदर्शक व नागरिकाभिमुख प्रशासनाच्या उद्देशाला बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर AIR न्यूजचे संपादक सय्यद मुनीरुद्दीन पि. सय्यद जियाउद्दीन यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन नांदेड येथील संबंधित रजिस्ट्री कार्यालयांमध्ये तातडीने लक्ष घालून आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक १, २ व ३ तसेच तालुक्यातील संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये अनधिकृत दलालांचा वावर पूर्णपणे बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच कार्यालयात केवळ अधिकृत कर्मचारी, पत्रकार व नियमानुसार अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय नोंदणीसाठी लागणारे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी केवळ अधिकृत मुद्रांक विक्रेत्यांमार्फतच स्वीकारण्यात यावी. नागरिकांना आवश्यक कागदपत्रे, शासकीय शुल्क व नोंदणी प्रक्रियेची संपूर्ण माहिती कार्यालयात स्पष्टपणे प्रदर्शित करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
प्रत्येक कार्यालयात नागरिकांसाठी स्वतंत्र हेल्प डेस्क सुरू करावा, तसेच कार्यालय परिसरातील आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून नियमित देखरेख ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दलाली, आर्थिक गैरव्यवहार किंवा नागरिकांची फसवणूक होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नागरिकांना कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट, सुलभ आणि पारदर्शक सेवा मिळावी यासाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे.
तसेच नांदेड येथील दुय्यम निबंधक कार्यालय नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित होणार असल्याने फक्त दस्तलेखक व मुद्रांक विक्रेत्यांना नवीन कार्यालयात जागा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक १, २ व ३ तसेच तालुक्यातील कार्यालयांच्या परिसरातील भू-माफियांकडून रिकाम्या प्लॉटवर कब्जा करून त्यावर बेकायदेशीरपणे व्यवहार केले जात असल्याच्या तक्रारींचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे.
सदर नोंदणी केलेले दस्त घेणार किंवा देणार यांचा आधार कार्डचा तपास करून त्यांची सत्यता पडताळल्यानंतरच दस्त नोंदणी करण्यात यावी. याबाबत संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून योग्य मार्ग काढण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे.
— सय्यद मुनीरुद्दीन पि. सय्यद जियाउद्दीन
AIR न्यूज संपादक, नांदेड



