जिला

सांगवीत नियोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जागेवर झेंडा रोवल्याने तणाव

समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याची बौद्ध समाजबांधवांची मागणी

 

 

नांदेड, दि.२७ विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सांगवी (बु.) येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेवर दि.२६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री एका झेंड्याची स्थापना करण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी बौद्ध समाजबांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनानुसार, सदर जागेवर लहुजी साळवे व अण्णाभाऊ साठे यांचा फोटो असलेला झेंडा रात्रीच्या सुमारास रोवण्यात आला. घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही समाजातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

बौद्ध समाजबांधवांच्या म्हणण्यानुसार, गट क्रमांक १४१ मधील संबंधित जागेचा पूर्वीपासून बौद्ध समाजाच्या लहान मुलांसाठी स्मशानभूमी म्हणून वापर होत होता. २०१० पासून सदर जागेचा स्मशानभूमी म्हणून वापर होत नसून तेथे विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच जयंती व इतर कार्यक्रमांच्या वेळी ध्वजारोहण आणि वंदना घेण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

गावाच्या पुनर्वसनाच्या काळापासून सदर जागा सम्राट अशोक बुद्ध विहाराच्या कार्यकारिणीच्या ताब्यात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा तसेच वाचनालय उभारण्याचा समाजाचा मानस असल्याचेही सांगण्यात आले आहे.

सदर गट क्रमांक १४१ मध्ये एकूण ४० आर क्षेत्र असून, त्यापैकी ६६ × ६६ क्षेत्रफळाची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी नियोजित करण्यात आली असल्याचे निवेदनात नमूद आहे. सदरील जागेची नोंद सम्राट अशोक बुद्ध विहाराच्या नावे करण्यात यावी तसेच संबंधित फेरफाराची नोंद महसूल अभिलेखात घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या घटनेमागे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला असून, घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांचा शोध घ्यावा आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी,दरम्यान सदर जागेबाबतचे जुने महसूल व ग्रामपंचायत अभिलेख तपासून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढील निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *