थोडेसे भारताबाहेरमधून उलगडली जगभ्रमंतीची नवी दृष्टी- डॉ. पी. विठ्ठल
डॉ. राम वाघमारे लिखित थोडेसे भारताबाहेर या पुस्तकाचे थाटात प्रकाशन

नांदेड,५- प्रवास म्हणजे केवळ नवनवीन ठिकाणांना भेट देणे नव्हे, तर त्या ठिकाणचा इतिहास, संस्कृती, माणसे आणि जीवनशैली जाणून घेण्याची संधी असते. प्रवासातून माणसाची विचारदृष्टी समृद्ध होते आणि जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो. प्रा. राम वाघमारे यांच्या थोडेसे भारताबाहेर या प्रवासवर्णनातून वाचकांना असाच समृद्ध अनुभव मिळतो, असे मत प्रसिद्ध साहित्यिक डॉ. पी. विठ्ठल यांनी व्यक्त केले.
इसाप प्रकाशन आणि बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बिजूर, ता. बिलोली यांच्या वतीने डॉ. राम वाघमारे लिखित थोडेसे भारताबाहेर या प्रवासवर्णनाच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन ४ सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात करण्यात आले. डॉ. गायत्री पांपटवार यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवी शिवाजी अंबुलगेकर होते, तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. पी. विठ्ठल बोलत होते.

डॉ. विठ्ठल म्हणाले, भाषा ही केवळ संवादाचे माध्यम आहे. कोणतीही भाषा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. त्या भाषेतून व्यक्त होणारी भावना आणि विचार लोकांपर्यंत किती प्रभावीपणे पोहोचतात, हे अधिक महत्त्वाचे आहे.
मराठीतील प्रवासवर्णनाच्या परंपरेचा संदर्भ देताना डॉ. पी. विठ्ठल यांनी विष्णुदास गोडसे यांच्या माझा प्रवास या ग्रंथाचा उल्लेख केला. त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या माझा रशियाचा प्रवाससह पु. ल. देशपांडे, गो. नी. दांडेकर आणि मीना प्रभू यांसारख्या साहित्यिकांनी मराठी प्रवासवर्णन समृद्ध केल्याचे त्यांनी सांगितले.
या समृद्ध परंपरेला डॉ. राम वाघमारे यांचे थोडेसे भारताबाहेर हे पुस्तक पुढे नेत आहे. साधी, सहज आणि वाचकांना आपलेसे करणारी भाषा हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य असून, लेखकाने केवळ स्थळवर्णन न करता त्यामागील संस्कृती आणि अनुभव संवेदनशीलतेने मांडले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
१२ ते १३ वर्षांपूर्वी केलेल्या ताश्कंद, दुबई आणि नेपाळ या तीन देशांच्या प्रवासातील अनुभवांना वाघमारे यांनी थोडेसे भारताबाहेर मध्ये शब्दबद्ध केले आहे. ताश्कंद भेटीदरम्यान भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या स्मारकाला दिलेली भेट आणि त्यांच्या तत्त्वनिष्ठ राजकारणाची केलेली आठवण हा पुस्तकातील विशेष उल्लेखनीय भाग असल्याचेही डॉ. पी. विठ्ठल यांनी सांगितले.
हे पुस्तक केवळ पर्यटनस्थळांची माहिती देणारे नसून, वाचकांची सांस्कृतिक आणि सौंदर्यदृष्टी विस्तारण्याचे काम करते. प्रवासातील अनुभवांकडे संवेदनशील नजरेने पाहण्याची लेखकाची दृष्टी या पुस्तकाला साहित्यिक मूल्य प्राप्त करून देते, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी शिवाजी अंबुलगेकर यांनी जागतिक प्रवासवर्णनांच्या दाखल्यांतून जगभ्रमंतीचे महत्त्व विशद केले. जग पाहिल्याने माणसाचे अनुभवविश्व विस्तारते, विचार समृद्ध होतात आणि त्यातून समाजविकासालाही चालना मिळते, असे त्यांनी सांगितले.
डॉ. राम वाघमारे यांच्या पुस्तकामुळे वाचकांना परदेशातील अनुभवांसोबतच इतिहास, संस्कृती आणि तेथील माणसांकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत दाढेल यांनी केले. सूत्रसंचालन राम तरटे यांनी केले, तर प्रा. डॉ. भगवान सूर्यवंशी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. विलास ढवळे, मिलिंद व्यवहारे, भालचंद्र जोंधळे आदींनी परिश्रम घेतले.



