परभणीच्या रखडलेल्या विकासकामांचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

परभणी (जिल्हा प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्यातील रखडलेल्या विविध विकासकामांचा जाब विचारण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लावण्याबाबत निवेदन देण्यात आले.
परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील व आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली तसेच लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीपकुमार खोपडे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या माध्यमातून परभणीच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याची मागणी करण्यात आली.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, समांतर पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण प्रकल्प, नाट्यगृह, क्रीडा संकुल, साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा, रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विविध सिंचन प्रकल्प, सायन्स पार्क, जिंतूर बायपास, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी रुग्णालयाची इमारत, मेगा टेक्सटाईल पार्क यांसह विविध प्रलंबित विकासकामांचा हिशोब सरकारकडे मागण्यात आला.

“वर्षानुवर्षे घोषणा होत आहेत; आता घोषणा नकोत, प्रत्यक्ष काम हवे,” अशी भूमिका आंदोलकांनी व्यक्त केली. परभणीच्या हक्काचा विकास निधी उपलब्ध करून देऊन रखडलेली विकासकामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या मागण्यांसाठी शिवसेनेचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मोर्चामध्ये पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



