शहर

महापालिकेकडून विसर्जन व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी;महापौर व आयुक्तांचा संयुक्त आढावा

 

 

 

नांदेड,१३ सप्टेंबर: आगामी गणेशोत्सव व श्री विसर्जन सोहळा सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या *महापौर सौ.कविता संतोष मुळे* आणि *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी संयुक्तपणे शहरातील प्रमुख ५ विसर्जन स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. या दौऱ्यात *उपमहापौर दिपकसिंह रावत, महिला बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील* यांच्यासह मनपाचे इतर वरिष्ठ अधिकारी व विभाग प्रमुख उपस्थित होते.

 

यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे नदी पात्रात पाण्याची पातळी कमी असल्याने, नागरिकांनी व गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.या पाहणी दौऱ्यादरम्यान महापौर आणि आयुक्त यांनी एकूण ५ प्रमुख स्थळांना भेटी देऊन आवश्यक त्या सुधारणा व व्यवस्थेचे निर्देश दिले. आसना नदी परिसर (पासदगाव व सांगवी) या दोन्ही ठिकाणी कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जन करण्यासंबंधीच्या कामांचा विशेष आढावा घेण्यात आला. पर्यावरणपूरक विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती आणि तेथील सोयीसुविधा वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे पुयनी व झरी खदान परिसर या दोन्ही खदान परिसरात मोठ्या आकाराच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबतच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. मोठ्या मूर्तींचे विसर्जन सुरक्षितपणे व्हावे यासाठी रॅम्प, क्रेन आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच गोदावरी नदीच्या मुख्य नावघाट विसर्जन स्थळाला भेट देऊन तेथील घाटांची स्वच्छता, डागडुजी आणि मार्गांच्या दुरुस्तीची पाहणी करण्यात आली.

 

पाहणी दरम्यान विसर्जनाच्या दिवशी कोणतीही आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यासाठी अग्निशामक दल आणि वैद्यकीय पथके पूर्णपणे सुसज्ज ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सर्व घाटांवर जीवरक्षक आणि रुग्णवाहिका तैनात राहतील. विसर्जनाच्या दिवशी नागरिकांना व भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, यादृष्टीने पाणी, तात्पुरते मंडप, बॅरिकेडिंग आणि विद्युत व्यवस्था यांसारख्या सर्व आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.

 

*महापौरांचे नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन:*

श्री गणेश उत्सवातील विसर्जन सोहळा हा आनंदाचा उत्सव आहे. त्यामुळे घाटांवर व खदान परिसरात विनाकारण गर्दी न करता प्रशासनाने दिलेल्या सुरक्षिततेच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनासोबत समन्वय ठेवून विसर्जन सोहळा शांततेत पार पाडण्यास मदत करावी,*महापौर सौ.कविता संतोष मुळे* यांनी केले आहे.

 

*महापालिका आयुक्तांचे नागरिकांना आवाहन:*

यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे नदी पात्रात पाण्याची पातळी अत्यंत कमी आहे. ही बाब लक्षात घेऊन सर्व गणेश मंडळे आणि घरगुती गणपती विसर्जन करणाऱ्या नागरिकांनी महापालिकेच्या यंत्रणेला व कृत्रिम तलावांच्या वापराला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी केले आहे.

 

या प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यात महापौर, उपमहापौर व आयुक्तांसोबत मनपाचे अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त गंगाधर इरलोड, उपायुक्त स.अजितपालसिंग संधु, शहर अभियंता सुमंत पाटील, सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादिक, कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर, संघरत्न सोनसळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत रिट्ठे, क्षेत्रिय अधिकारी डॉ. मिर्झा बेग, रावण सोनसळे, राजेश जाधव, नागनाथ पतंगे, गौतम कवडे, विठ्ठल तिडके, उपअभियंता खुशाल कदम, सतीश ढवळे, अग्निशमन अधिकारी निलेश कांबळे आदी उपस्थित होते.

 

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *