क्राईम

एकाच जमिनीची वारंवार विक्री करून ११ कोटी ८५ लाखांचा गंडा

बनावट सातबारा व दस्तऐवज तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक

 

नांदेड (मुनवर खान) : बनावट कागदपत्रे व सातबारा उतारे तयार करून एकाच शेतजमिनीची अनेक नागरिकांना विक्री केल्याचे भासवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संघटित टोळीचा नांदेड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधार राहुल नागोराव गायकवाड याच्यासह जखाजी ऊर्फ बंडू धोंडजी पावडे व अमोल अशोकराव मालेगावकर या तिघांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत ३५ नागरिकांची तब्बल ११ कोटी ८५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मौजे मेंढला खुर्द, ता. अर्धापूर येथील शेत गट क्र. ७३ मधील जमीन स्वतःच्या मालकीची असल्याचे सांगून मुख्य आरोपी राहुल गायकवाड याने जानेवारी २०२६ मध्ये फिर्यादी देवेंद्र शर्मा यांच्याशी संपर्क साधला. बनावट सातबारा व रजिस्ट्रीची कागदपत्रे दाखवून तसेच जमिनीची पाहणी घडवून आणून त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. सदर जमिनीचा व्यवहार १ कोटी २६ लाख रुपयांना ठरविण्यात आला.

१८ फेब्रुवारी २०२६ रोजी मालेगाव रोडवरील एकादशी हॉटेल येथे नोटरीकृत सौदाचिट्ठी तयार करण्यात आली. त्यावेळी फिर्यादीकडून ३० लाख रुपये रोख, तर दुकानासमोर रात्री ५ लाख रुपये रोख, असे एकूण ३५ लाख रुपये आरोपींनी स्वीकारले. मात्र, त्यानंतर याच जमिनीची बनावट कागदपत्रांच्या आधारे इतर नागरिकांनाही विक्री करण्यात आल्याचे समोर आले. पैसे परत मागितल्यानंतर आरोपींकडून टाळाटाळ करण्यात आल्याने फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.

या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २२६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१६(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने १३ सप्टेंबर रोजी तपास नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजने यांच्याकडे वर्ग करण्यात आला.

तपासादरम्यान आरोपींनी संघटितरीत्या एकाच जमिनीच्या आधारे अनेक नागरिकांची फसवणूक केल्याचे उघड झाले. आतापर्यंत ३५ नागरिकांकडून ११ कोटी ८५ लाख रुपये लाटल्याचे निष्पन्न झाले असून, १६ नागरिकांचे जबाब नोंदवून त्यांची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. या व्यवहारांमध्ये विविध स्थानिक प्रॉपर्टी डीलर्स व दलालांचा सहभाग असल्याचेही तपासात समोर आले आहे. आरोपींविरुद्ध यापूर्वी सुमारे १२ दिवाणी व फौजदारी दावे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुख्य आरोपी राहुल गायकवाड यास १३ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. जखाजी ऊर्फ बंडू पावडे यास १४ सप्टेंबर रोजी गुन्हे शोध पथक, भाग्यनगर यांनी, तर अमोल मालेगावकर यास १५ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. राहुल गायकवाड व अमोल मालेगावकर पोलीस कोठडीत असून, जखाजी पावडे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे व त्यांच्या पथकाने तसेच गुन्हे शोध पथक, भाग्यनगर यांनी केली.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन : शेतजमीन, प्लॉट किंवा कोणतीही स्थावर मिळकत खरेदी करण्यापूर्वी महसूल विभागाकडून मूळ मालकी, सातबारा उतारा, फेरफार नोंदी व कायदेशीर दस्तऐवजांची खातरजमा करावी. खासगी सौदाचिट्ठीवर किंवा अनधिकृत दलालांच्या सांगण्यावरून मोठी रोख रक्कम देणे टाळावे. या आरोपींकडून फसवणूक झालेल्या नागरिकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, नांदेड शहर किंवा वजीराबाद पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *