जिला

शाश्वत स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक; पालकमंत्री अतुल सावे

स्वच्छता ही सेवा-२०२६ अभियानाचा नांदेडमध्ये जिल्हास्तरीय शुभारंभ

 

नांदेड, १७ सप्टेंबर, स्वच्छ भारताची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी केवळ शासकीय यंत्रणेचा सहभाग पुरेसा नसून स्वच्छतेची चळवळ लोकचळवळ बनणे आवश्यक आहे. शाश्वत स्वच्छतेसाठी प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यान येथे आयोजित शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते स्वच्छता ही सेवा-२०२६ या अभियानाचा जिल्हास्तरीयल शुभारंभ करण्यात आला. स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत विकसित भारत या यंदाच्या संकल्पनेवर आधारित हे अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे.

यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खासदार रवींद्र चव्हाण, महापौर कविताताई मुळे, आमदार भीमराव केराम, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते.

गावागावांत तसेच शहरांमध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिलेली अस्वच्छ ठिकाणे शोधून त्यांची स्वच्छता करावी. शाळा, अंगणवाडी, महाविद्यालये तसेच विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी. स्वच्छतेची सवय केवळ अभियानाच्या कालावधीपुरती मर्यादित न राहता ती दैनंदिन जीवनाचा भाग बनली पाहिजे, असे पालकमंत्री सावे यांनी सांगितले.

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यापूर्वी नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी स्वयंप्रेरणा निर्माण करून सामूहिक कृतीला बळ देण्याच्या उद्देशाने स्वच्छता ही सेवा अभियान राबविले जाते. यंदाच्या अभियानातून स्वच्छतेच्या कार्यात नागरिकांचा व्यापक सहभाग वाढविण्यासोबतच स्वच्छतेविषयी जबाबदारी आणि अभिमानाची भावना निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.

अभियान कालावधीत सार्वजनिक स्वच्छता, सफाई मित्र सुरक्षा शिबिरे, सफाई मित्रांचा सन्मान, स्वच्छता जनजागृती यासह विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

 

 

एक दिवस, एक तास, एक साथ’मधून महाश्रमदान

स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी एक दिवस, एक तास, एक साथ या उपक्रमातून स्वच्छतेसाठी महाश्रमदान करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शहरातील प्रभाग तसेच ग्रामीण भागातील गावांमध्ये एक तास श्रमदान करावे, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *