‘हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरण : इतिहासाच्या आरशातून’ विषयावर नांदेडमध्ये भव्य परिसंवाद

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : मुस्लिम प्रतिनिधी कौन्सिल, नांदेडच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी रोशन फंक्शन हॉल येथे ‘हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरण : इतिहासाच्या आरशातून’ या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, इतिहास अभ्यासक, युवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर हैदराबाद संस्थानाच्या भारतीय संघराज्यातील विलिनीकरणाशी संबंधित ऐतिहासिक घटनांवर विविध दृष्टीकोनातून चर्चा करण्यात आली. इतिहासातील घटनांचा अभ्यास उपलब्ध दस्तऐवजांच्या आधारे व्हावा आणि नव्या पिढीला इतिहासाची विविध बाजू समजावी, या उद्देशाने हैदराबाद येथील इतिहास अभ्यासक व तज्ज्ञांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सय्यद अकबर यांच्या कुरआन पठणाने झाली. त्यानंतर आसिफ हुसेन यांनी गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुस्लिम प्रतिनिधी कौन्सिलचे सरचिटणीस सय्यद इमरान यांनी केले.
मुस्लिम प्रतिनिधी कौन्सिल, नांदेडचे अध्यक्ष अॅड. नसीरुद्दीन फारुकी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, हैदराबाद संस्थानाच्या इतिहासासंदर्भातील गैरसमज दूर करून नव्या पिढीला ऐतिहासिक घटनांची माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
हैदराबाद येथील लेखक व इतिहास अभ्यासक कॅप्टन लंगाला पांडुरंगा रेड्डी यांनी दस्तऐवजांच्या आधारे आपले विचार मांडले. त्यांनी हैदराबाद संस्थानाचे भारतीय संघराज्यात झालेले विलिनीकरण, तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि निजामाच्या कारकिर्दीतील विविध बाबींवर प्रकाश टाकला. त्यांच्या मते, १७ सप्टेंबरच्या ऐतिहासिक घटनेकडे पाहताना उपलब्ध दस्तऐवज व तत्कालीन परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे.
ज्येष्ठ पत्रकार व विश्लेषक डॉ. खालिद मुल्ला यांनी इतिहासाच्या सादरीकरणाबाबत विचार मांडताना ऐतिहासिक घटनांकडे विविध बाजूंनी पाहण्याची गरज व्यक्त केली. विशिष्ट दृष्टिकोनातून इतिहास मांडल्यामुळे नव्या पिढीच्या इतिहासाच्या आकलनावर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार डॉ. इनामुर्रहमान गयूर यांनी अध्यक्षीय भाषणात हैदराबाद संस्थानाच्या इतिहासातील विविध पैलूंवर भाष्य केले. त्यांनी तत्कालीन काळातील शैक्षणिक संस्था, उस्मानिया विद्यापीठाची स्थापना, प्रशासनातील विविध भाषांचा वापर तसेच तत्कालीन सामाजिक व राजकीय परिस्थितीचा उल्लेख केला. त्यांनी रझाकार आणि कम्युनिस्ट चळवळीशी संबंधित घटनांवरही आपले विचार मांडले.
या कार्यक्रमास अखिल भारतीय तामीर-ए-मिल्लतचे माजी अध्यक्ष झियाउद्दीन नय्यर यांची विशेष उपस्थिती होती. उपस्थित नागरिकांनी वक्त्यांचे विचार लक्षपूर्वक ऐकून हैदराबाद संस्थानाच्या इतिहासातील विविध पैलू जाणून घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुस्लिम प्रतिनिधी कौन्सिलचे सचिव अॅड. नदीम पठाण यांनी उपस्थित मान्यवर व नागरिकांचे आभार मानले. त्यानंतर दुआने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



