म्हाडा कॉलनी, नवीन कौठा येथे कचऱ्याचे साम्राज्य; महापालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवर नागरिकांचा संताप

नांदेड : नांदेड शहरातील नवीन कौठा परिसरातील म्हाडा कॉलनीमध्ये सुखा व ओला कचरा मोठ्या प्रमाणात साचला असून, परिसराच्या स्वच्छतेकडे महापालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले आहे. कचरा न उचलल्यामुळे रस्त्याच्या कडेला, नाल्यांमध्ये तसेच मोकळ्या जागांमध्ये प्लास्टिक, घरगुती कचरा आणि इतर घाण साचली आहे.
या परिसरातील नाल्यांमध्ये कचरा साचल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसून दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. मोकळ्या जागांमध्ये कचऱ्याचे ढीग निर्माण झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
स्वच्छ भारत अभियान, घनकचरा व्यवस्थापन आणि शहर स्वच्छतेबाबत प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात असताना प्रत्यक्षात म्हाडा कॉलनी, नवीन कौठा परिसरातील परिस्थिती मात्र त्याच्या पूर्णपणे विपरीत दिसत आहे. ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्याची व्यवस्था प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे.
महापालिका प्रशासनाने तातडीने या परिसराची पाहणी करून कचरा उचलावा, नाल्यांची स्वच्छता करावी, नियमित कचरा संकलनाची व्यवस्था करावी तसेच कचरा टाकणाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय कलाल, गौड, समाज युवा संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष सुनील प्रभाकर अनंतवार यांनी केली आहे.
नागरिकांकडून कर वसूल केला जात असताना त्यांना स्वच्छ आणि आरोग्यदायी परिसर मिळणे हा मूलभूत नागरी सुविधांचा भाग आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ कागदोपत्री स्वच्छता न दाखवता प्रत्यक्ष परिसरात नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणीही अनंतवार यांनी केली.
“म्हाडा कॉलनी, नवीन कौठा येथील कचऱ्याची परिस्थिती तातडीने सुधारली नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून पुढील प्रशासकीय स्तरावर हा प्रश्न मांडण्यात येईल,” असा इशारा सुनील प्रभाकर अनंतवार प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय कलाल, गौड, समाज यांनी दिला.



