मसाप नांदेड व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेला उदंड प्रतिसाद

नांदेड, २२ सप्टेंबर- वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी आणि मराठी भाषेचा जागर अधिक व्यापक व्हावा, या उद्देशाने मराठवाडा साहित्य परिषद, शाखा नांदेड आणि जिल्हा परिषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेला जिल्हाभरातून उदंड प्रतिसाद मिळाला.
इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी अनुदानित, विनाअनुदानित, इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मराठी भाषा अधिक लोकाभिमुख, व्यवहाराभिमुख आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडली जावी, विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या कक्षा अधिक रुंदाव्यात, विविध विषयांवरील त्यांची आकलन क्षमता वाढावी, ग्रामपंचायतीच्या अधिकारापासून ते देशाच्या संविधानापर्यंत अनेक बाबींचा त्यांनी चिकित्सक दृष्टीने अभ्यास करावा व त्यातून त्यांचे स्वतःचे मत मांडावे या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता अभियान व आपली जबाबदारी’ , ‘सोशल मीडिया- दुधारी अस्त्र’, ‘माझे कुटुंब, माझी शाळा, माझे गाव, माझी जबाबदारी’ , ‘संविधान आणि माझे कर्तव्य’ असे चार विषय देण्यात आले होते.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये एकाच दिवशी ही निबंध स्पर्धा घेण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील १६ ही पंचायत समित्यांचे गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्पर्धेच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
प्रत्येक शाळेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे निबंध तालुकास्तरावर पाठविण्यात आले. तालुकास्तरीय परीक्षक समितीने प्राप्त निबंधांमधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे प्रत्येकी तीन निबंध निवडून जिल्हास्तरीय परीक्षणासाठी पाठविले. जिल्हास्तरावर प्राप्त झालेल्या निबंधांमधून प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच दोन उत्तेजनार्थ असे एकूण पाच विजेते निवडण्यात येणार आहेत.
या विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. येत्या १० ऑक्टोबर रोजी लोहा येथील डी. के. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये आयोजित मराठवाडा साहित्य परिषदेच्या तिसऱ्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, शिक्षणाधिकारी माधव सलगर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य देविदास फुलारी, मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य संजीव कुलकर्णी, मसाप नांदेड शाखेचे अध्यक्ष बालाजी इबितदार, उपाध्यक्ष दिगंबर कदम, श्रीनिवास मस्के, कोषाध्यक्ष तथा माजी शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी, कार्यवाह प्रा. महेश मोरे, सहकार्यवाह राम तरटे, प्रा. ललिता बोकारे-शिंदे, प्रा. डॉ. योगिनी सातारकर, अनुजा डोईफोडे, प्रा. डॉ. संजय जगताप, शेख निजाम गवंडगावकर, प्रा. धाराशिव शिराळे, ॲड. विजयकुमार भोपी, ॲड. गजानन पिंपरखेडे यांच्यासह मसाप नांदेड शाखेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी पुढाकार घेतला.
मराठी भाषेचा विद्यार्थ्यांमध्ये अधिक जागर निर्माण करण्याबरोबरच लेखन, वाचन आणि विचार करण्याची सवय रुजविण्यासाठी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. जिल्हाभरातील विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद हा मराठी भाषेविषयीची आस्था आणि वाचन-लेखन संस्कृतीच्या वाढत्या सहभागाचे द्योतक ठरला आहे.



