एकीकडे ‘झाडे लावा, झाडे जगवा ’चा संदेश; दुसरीकडे हिमायतनगर बाजार चौकातील २०० वर्षे जुने झाड तोडल्याची माहिती

हिमायतनगर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने झाडे लावा, झाडे जगवा आणि वृक्षसंवर्धनासाठी दरवर्षी विविध उपक्रम राबविले जात असताना, हिमायतनगर शहरातील बाजार चौकात तब्बल २०० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाणारे झाड तोडण्यात आल्याची चर्चा सध्या शहरभर वेगाने सुरू आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हे झाड अनेक पिढ्यांपासून बाजार चौकातील नागरिकांना उन्हाळ्याच्या कडक उन्हात सावली देत होते. विशेष म्हणजे हे झाड आजारी होते किंवा कधीही कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता,?
अशी कोणतीही माहिती नागरिकांना देण्यात आली नव्हती, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
एकीकडे शासन झाडे लावा, झाडे जगवा असे आवाहन करते आणि दुसरीकडे शहरातील एवढ्या जुन्या झाडावर कुऱ्हाड का चालविण्यात आली?” असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
वृक्षतोडीसाठी कायद्यात परवानगीची तरतूद
महाराष्ट्रातील शहरी भागात झाडे तोडण्याबाबत महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५ लागू आहे. या कायद्यातील कलम ८ नुसार, शहरी क्षेत्रात कोणतेही झाड तोडण्यासाठी किंवा तोडण्यास कारणीभूत होण्यासाठी संबंधित Tree Officer वृक्ष प्राधिकरणाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. परवानगीसाठी झाडाचे वर्णन, ठिकाणाचा आराखडा आणि झाड तोडण्याचे कारण यासंबंधी प्रक्रिया कायद्यात नमूद आहे.
तसेच, कायद्यातील कलम २०-अ नुसार Tree Officer किंवा अधिकृत अधिकारी अथवा पोलीस अधिकारी झाडांची तोड किंवा नाश रोखण्यासाठी आवश्यक ती कारवाई करू शकतात.
विनापरवानगी वृक्षतोड केल्यास शिक्षेची तरतूद
कायद्याच्या कलम २१ नुसार, कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करून झाड तोडल्यास किंवा तोडण्यास कारणीभूत ठरल्यास दोष सिद्ध झाल्यानंतर दंड आणि कारावासाची तरतूद आहे. २०२१ मधील दुरुस्तीनंतर दंडाची रक्कम झाडाच्या मूल्यांकनाच्या रकमेइतकी, शासनाने अधिसूचित केलेल्या पद्धतीनुसार, मात्र कमाल ₹१ लाखांपर्यंत असू शकते. तसेच किमान एक आठवडा ते कमाल एक वर्षापर्यंत कारावासाची तरतूद आहे. प्रत्येक झाडाची विनापरवानगी तोड स्वतंत्र गुन्हा मानली जाते.
नागरिकांचा प्रशासनाला सवाल
मग हिमायतनगर बाजार चौकातील या जुन्या झाडाची तोड कोणत्या आदेशाने करण्यात आली? झाड तोडण्यासाठी संबंधित वृक्ष प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेण्यात आली होती का? झाड तोडण्यामागील कारण काय होते? झाड धोकादायक किंवा रोगग्रस्त असल्याचा कोणता अहवाल होता का? तसेच या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती का? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
शासनाकडून वृक्षसंवर्धनासाठी जनजागृती केली जात असताना शहरातील ऐतिहासिक स्वरूपाचे जुने झाड तोडण्याची आवश्यकता का निर्माण झाली, याबाबत हिमायतनगर नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांसमोर वस्तुस्थिती आणि संबंधित परवानगीचे कागदपत्र स्पष्ट करावेत, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या झाडाची प्रत्यक्षात किती वर्षांची होती, वृक्षतोडीसाठी परवानगी देण्यात आली होती का आणि तोड करण्यामागील अधिकृत कारण काय होते, याची अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.



