नांदेडमध्ये पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा तक्रारदारांशी ‘जनसंवाद’
४२ तक्रारदारांचे अर्ज स्वीकारले; संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीच्या सूचना

नांदेड : नागरिकांच्या तक्रारी समजून घेऊन त्यांचा जलद निपटारा करण्यासोबतच पोलीस आणि नागरिकांमधील संवाद वाढविण्याच्या उद्देशाने नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पुढाकारातून ‘जनसंवाद’ उपक्रम राबविण्यात येत आहे.
३० सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक, नांदेड कार्यालयात जिल्हा पोलिसांच्या कामकाजाचा मासिक आढावा घेतल्यानंतर दुपारी २ ते ५ या वेळेत शहाजी उमाप यांनी जिल्ह्यातील तक्रारदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी एकूण ४२ तक्रारदारांनी आपले लिखित अर्ज सादर केले.
यामध्ये मालमत्ता विषयक वाद, हरवलेल्या व्यक्ती, मारहाण, दाखल गुन्ह्यांचा तपास, पोलीस संरक्षण तसेच अवैध व्यवसायांसंबंधी तक्रारींचा समावेश होता. प्राप्त तक्रारींची दखल घेत संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या.
तक्रारींच्या जलद निवारणासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने यापूर्वीच ‘संवेदना’ तक्रार निवारण प्रणाली सुरू केली आहे. जनसंवादादरम्यान प्राप्त झालेले सर्व अर्ज ‘संवेदना’ पोर्टलद्वारे संबंधित अधिकाऱ्यांकडे पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी वर्ग करण्यात येणार आहेत. तसेच तक्रारींवर झालेल्या कार्यवाहीचा आढावा नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील फीडबॅक टीमकडून घेतला जाणार आहे.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस निरीक्षक तसेच विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.



