दिव्यांगांचे उद्या मनपात ‘गांधीगिरी’ आंदोलन
स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधणार

नांदेड : दिव्यांगांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्वसमावेशक दिव्यांग सशक्तीकरण असोसिएशनच्या वतीने गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका कार्यालयात ‘स्वच्छता अभियान गांधीगिरी आंदोलन’ करण्यात येणार आहे.
महापालिका प्रशासनाकडून दिव्यांगांच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तसेच त्यांच्या विविध प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांनी सांगितले.
या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्या स्नेहनगर, नांदेड येथील निवासस्थानी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आंदोलनाचा समारोप करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
दिव्यांगांसाठी शासनाने मंजूर केलेल्या विविध कल्याणकारी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
दिव्यांगांच्या या गांधीगिरी आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन राहुल साळवे यांनी केले आहे.


