महात्मा फुले हायस्कूलच्या एनसीसी कॅडेट्सचे स्वच्छता अभियान
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त स्त्री रुग्णालयात श्रमदान; स्वच्छतेचा संदेश

नांदेड,३- महात्मा फुले हायस्कूल, बाबानगर, नांदेड येथील एनसीसी आर्मी विंग व एअर विंगच्या कॅडेट्सतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. स्वच्छ भारत, सुंदर भारत अभियानांतर्गत कॅडेट्सनी श्यामनगर येथील स्त्री रुग्णालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली.

जयंतीनिमित्त एनसीसी कॅडेट्सनी स्त्री रुग्णालय परिसराची स्वच्छता केली. यावेळी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनीही कॅडेट्सना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले.
स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून आपल्या घरापासून व परिसरापासून झाली पाहिजे. वैयक्तिक स्वच्छतेसोबतच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला. दरम्यान महात्मा फुले हायस्कूलच्या प्रांगणात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर एनसीसी कॅडेट्सनी शाळा परिसरात उत्स्फूर्तपणे श्रमदान करून स्वच्छता केली.
या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा कदम, पर्यवेक्षक जाधव, खानजोडे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. हा संपूर्ण उपक्रम एअर विंग प्रमुख फर्स्ट ऑफिसर दत्ता बारसे व आर्मी विंग प्रमुख सेकंड ऑफिसर पी. एस. केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. एनसीसी कॅडेट्सनी राबविलेल्या स्वच्छता व जनजागृतीपर उपक्रमाचे शाळा प्रशासन तसेच नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.



