परभणीत राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या शहराध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी?
युवकाला शहराध्यक्षपद देण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी; रिजवान खान यांच्या नावाची जोरदार चर्चा

परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटात शहराध्यक्षपदाच्या निवडीबाबत हालचालींना वेग आला असून, नव्या शहराध्यक्षपदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, युवकाला शहराध्यक्षपदाची संधी देण्यात यावी, अशी मागणी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांकडून होत असून, दर्गा रोड परिसरातील रहिवासी रिजवान खान यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
परभणी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटामध्ये आगामी काळात संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये शहराध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याला संधी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे शहराध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
अजितदादा गटाचे पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेशदादा विटेकर यांनी पक्षातील काही पदाधिकारी व मनपा सदस्यांसह मुंबई येथे वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती आहे. या चर्चेदरम्यान शहराध्यक्षपदासाठी रिजवान खान यांच्या नावाची चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
रिजवान खान हे दर्गा रोड परिसरातील रहिवासी असून, मागील मनपा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून निवडणूक लढविली होती. आमदार राजेशदादा विटेकर यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांचा समावेश असल्याची पक्षांतर्गत चर्चा आहे. मुंबईतील भेटीदरम्यान आमदार विटेकर यांच्यासोबत मनपातील काही सदस्य तसेच राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून मागील निवडणुकीत निवडणूक लढविलेले रिजवान खान व त्यांचे सहकारी उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, शहराध्यक्षपदासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा विविध माध्यमांमधून समोर येत असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, सध्या रिजवान खान हे एकच नाव चर्चेत आघाडीवर असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगितले जात आहे.
शहराध्यक्षपदाची अधिकृत निवड पक्षाच्या प्रांतिक नेतृत्वाकडून लवकरच केली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे अखेर कोणाच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब होते आणि आमदार राजेशदादा विटेकर यांची भूमिका या निवडीत कितपत प्रभावी ठरते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



