स्वच्छता ही सेवा पंधरवड्याचा नांदेड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
स्वच्छता मोहीम, महाश्रमदान, कचरा वर्गीकरण, प्लास्टिक निर्मूलनासह विविध उपक्रमांनी अभियानाचा समारोप

नांदेड,३- केंद्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता ही सेवा पंधरवड्याचा नांदेड जिल्ह्यात उत्स्फूर्त सहभाग आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत दिवस साजरा करून समारोप करण्यात आला. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वच्छता, जनजागृती आणि लोकसहभागावर भर देत विविध उपक्रम राबविण्यात आले.

पंधरवड्याच्या कालावधीत ग्रामपंचायत स्तरावर महाश्रमदान, अस्वच्छ ठिकाणांची स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, शाळा व अंगणवाडी परिसर स्वच्छता तसेच युवकांचा सक्रिय सहभाग घेण्यात आला. बाजारपेठा, बसस्थानके आणि इतर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.
कचरा व्यवस्थापन आणि कचरा वर्गीकरणाला विशेष महत्त्व देण्यात आले. ओला, सुका आणि घातक कचरा यांचे स्वतंत्र संकलन, वर्गीकरण व योग्य व्यवस्थापन याबाबत नागरिक, विद्यार्थी आणि ग्रामपंचायत स्तरावर मार्गदर्शन करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भातील नियम, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका व जबाबदारी याबाबतही जनजागृती करण्यात आली.
शाळा स्तरावर निबंध स्पर्धा, स्वच्छता उपक्रम तसेच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे उपक्रम घेण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्लास्टिक कचरा निर्मूलनासाठीही गावागावांत जनजागृती करण्यात आली. ग्रामपंचायत स्तरावर सफाई कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली. सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, देखभाल व दुरुस्ती यावर भर देण्यात आला. स्वच्छता सेवा अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्थानिक पातळीवर विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला. ग्रामपंचायत, शाळा, विद्यार्थी, युवक, सफाई कर्मचारी आणि नागरिक यांच्या सहभागातून स्वच्छता ही सेवा अभियानाला जिल्ह्यात व्यापक लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने २ ऑक्टोबर रोजी विविध ठिकाणी स्वच्छता उपक्रम राबवून स्वच्छतेचा संदेश अधिक प्रभावीपणे जनमानसात पोहोचवत पंधरवड्याचा समारोप करण्यात आला.



