मानव विकास कार्यक्रमांतर्गत महेश महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप
शेवडी (बा.) येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासासाठी मिळाला आधार

लोहा : तालुक्यातील शेवडी (बा.) येथील महेश महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मानव विकास कार्यक्रमांतर्गत सायकलींचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये-जा करताना होणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने या सायकलींचे वितरण करण्यात आले.
यावेळी कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय भोसीकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न सुकर करण्यासाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांना सायकली देण्यात आल्या.
कार्यक्रमास डॉ. यशवंत पाटील भोसीकर, मुख्याध्यापक दिलीप पवार, पालक किशनराव वानखेडे, गंगाधर वानखेडे, पिंटू वानखेडे, चरणसिंह गव्हाणे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सायकली मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न काही प्रमाणात सुकर होण्यास मदत होणार असून, विद्यार्थ्यांनी या सुविधेचा योग्य उपयोग करून शिक्षणात प्रगती साधावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. छाया : विनोद महाबळे



