जिला

दुष्काळसदृश परिस्थितीत कर्जवसुलीसाठी महिलांना त्रास देऊ नका!

मायक्रो फायनान्स कंपन्या व बँकांच्या वसुलीविरोधात टायगर ऑटो रिक्षा संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नांदेड : जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या बचत गटातील महिला, शेतकरी आणि ऑटो रिक्षा चालकांच्या कुटुंबांना बँका व मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात असल्याचा आरोप टायगर ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर कर्जवसुलीचा तगादा आणि मानसिक त्रास तात्काळ थांबवावा, अशी मागणी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अहमद (बाबा) यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, यंदा पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले असून, पाणीटंचाईचा परिणाम शेतीसह बांधकाम व्यवसाय, बाजारपेठ, छोटे-मोठे व्यवसाय आणि रोजगारावर झाला आहे. त्यामुळे शेतकरी, ऑटो रिक्षा चालक-मालक, कामगार, छोटे व्यावसायिक आणि सर्वसामान्य कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.

अशा परिस्थितीत बचत गटांच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्या महिलांकडे बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांचे वसुली प्रतिनिधी वारंवार घरभेटी देऊन हप्ते भरण्यासाठी दबाव टाकत असल्याच्या तक्रारी संघटनेकडे आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच, हप्ता न भरल्यास सिबिल स्कोअर खराब होईल, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काही महिला कर्जाचा हप्ता भरण्यासाठी अधिक व्याजदराने इतरांकडून पैसे उधार घेत असल्याचेही संघटनेने म्हटले आहे.

संघटनेच्या प्रमुख मागण्या
दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन आर्थिकदृष्ट्या असमर्थ महिलांकडून कर्जवसुलीसाठी होणारा तगादा व मानसिक त्रास थांबवावा. हप्ते भरण्यास सक्षम असलेल्या आणि स्वेच्छेने हप्ते भरणाऱ्या कर्जदारांकडून नियमानुसार वसुली करावी. धमकी, दबाव किंवा अपमानास्पद वागणूक देणाऱ्या वसुली प्रतिनिधींवर कारवाई करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
याशिवाय, कर्जाच्या हप्त्यांना मुदतवाढ किंवा स्थगिती देणे, कर्जाचे पुनर्गठन करणे तसेच शक्य असल्यास कर्जसवलत व कर्जमाफीबाबत शासनस्तरावर विचार करावा. थकीत हप्त्यांमुळे कर्जदारांच्या सिबिल स्कोअरवर प्रतिकूल परिणाम होऊ नये यासाठी नियमानुसार आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

मायक्रो फायनान्स कंपन्या व बँकांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना मानवी दृष्टिकोनातून कर्जवसुली करण्याच्या सूचना द्याव्यात. दुष्काळग्रस्त कर्जदार महिलांना शासकीय सवलती मिळवून देण्यासाठी समन्वय साधावा, तसेच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी, ऑटो रिक्षा चालक व इतर वाहनचालकांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. नागरिकांच्या तक्रारींसाठी विशेष हेल्पलाइन किंवा तक्रार कक्ष सुरू करावा, अशा मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे.

दुर्लक्ष केल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा
अनेक कुटुंबांकडे दैनंदिन घरखर्च भागवण्यासाठीही पुरेसे उत्पन्न नसताना कर्जाच्या हप्त्यांसाठी सतत तगादा लावल्यास आर्थिक संकटासोबत मानसिक तणावही वाढू शकतो. त्यामुळे महिला, शेतकरी आणि ऑटो रिक्षा चालकांच्या कुटुंबांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे, असे संघटनेने म्हटले आहे.
जिल्हा प्रशासनाने निवेदनाची तातडीने दखल घेऊन संबंधित बँका व मायक्रो फायनान्स कंपन्यांना आवश्यक सूचना द्याव्यात. अन्यथा टायगर ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही प्रदेशाध्यक्ष अहमद (बाबा) यांनी दिला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *