क्राईम

नांदेडच्या होळी सराफा परिसरात अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; पीडित महिलेची सुटका

आई-मुलाविरुद्ध गुन्हा दाखल; रोख रक्कम आणि चार मोबाईलसह 73 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : शहरातील होळी सराफा परिसरातील चंद्रकांत प्लाझा येथे सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर नांदेड पोलिसांनी छापा टाकून एका 33 वर्षीय पीडित महिलेची सुटका केली. या प्रकरणी एका महिलेसह तिच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी रोख रक्कम आणि चार मोबाईल फोन असा एकूण 73 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नांदेड शहरातील अनैतिक मानवी व्यापाराला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत 22 ऑक्टोबर 2026 रोजी इतवारा विभागाच्या पोलिसांना होळी सराफा येथील चंद्रकांत प्लाझामधील घर क्रमांक 019-059 येथे अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या (AHTU) पथकाने संयुक्त कारवाईचे नियोजन केले. दोन सरकारी पंच आणि एका बनावट ग्राहकाच्या मदतीने छाप्यापूर्वी पंचनामा करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचून छापा टाकला.

छाप्यादरम्यान पोलिसांना 33 वर्षीय महिला आढळून आली. प्राथमिक चौकशीत, दिपाली किशोर उदावंत (वय 51) आणि तिचा मुलगा नितीन किशोर उदावंत (वय 30), दोघेही रा. चंद्रकांत प्लाझा, होळी सराफा, नांदेड, हे महिलेला अधिक पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करत असल्याचा आरोप आहे. नितीन हा ग्राहक आणण्याचे काम करत होता, तर ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांपैकी अर्धी रक्कम आरोपी स्वतःकडे ठेवत असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी पंचांसमक्ष संबंधित घराची झडती घेऊन रोख रक्कम आणि चार मोबाईल फोनसह एकूण 73,010 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 355/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 143(2), 3(5) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियमातील कलम 4, 5, 6 आणि 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इतवारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस अंमलदार रितेश कुलथे, गणेश लोसरवार, ज्ञानोबा कवठेकर तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या मपोउपनि अश्विनी गायकवाड, अच्युत मोरे आणि महिला पोलीस अंमलदार दीपा कोकाटे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन

महिलांचे शोषण, अनैतिक मानवी व्यापार किंवा अशा प्रकारचे अवैध व्यवसाय आपल्या परिसरात सुरू असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ नांदेड पोलिसांना अथवा आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *