महाराष्ट्रा

तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब येथे दसरा (महल्ला) उत्सव उत्साहात साजरा

प्रशासक डॉ. स. विजय सतबीर सिंघ यांची माहिती

 

 

नांदेड : येथील तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब येथे दसरा (महल्ला) उत्सव पारंपरिक धार्मिक विधी, भक्तिभाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पूजनीय पंच प्यारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उत्सवात देश-विदेशातून आलेल्या हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

याबाबत माहिती देताना गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक डॉ. स. विजय सतबीर सिंघ यांनी सांगितले की, ११ ऑक्टोबरपासून साहिब श्री गुरु गोबिंद सिंघ जी महाराज यांनी रचलेल्या श्री दशम ग्रंथ साहिबमधील युद्धविषयक (चंडी) रचनांचे पठण दररोज रात्री ९ ते मध्यरात्रीपर्यंत करण्यात येत होते. मंगळवारी, २० ऑक्टोबर रोजी तख्त साहिबचे मुख्य ग्रंथी सिंघ साहिब ज्ञानी सरबजीत सिंघ जी निर्मले यांच्या हस्ते या पठणाची सांगता झाली. त्यानंतर गुरु साहिबांच्या ऐतिहासिक शस्त्रांची विधिवत पूजा करून त्यांना तिलक लावण्याची परंपरा भक्तिभावाने पार पाडण्यात आली.

दुपारी पारंपरिक शोभायात्रा अर्थात महल्ला सुरू करण्यापूर्वी अरदास करण्यात आली. त्यानंतर तख्त साहिबचे जत्थेदार सिंघ साहिब संत बाबा कुलवंत सिंघ जी आणि पंच प्यारे साहिब यांच्या मार्गदर्शनाखाली महल्लाला सुरुवात झाली. या मिरवणुकीत निशान साहिब, आकर्षक सजावट केलेले घोडे, नगारे, विविध धार्मिक जत्थे, गतका पथके तसेच विविध दल-पंथांचे प्रतिनिधित्व करणारे प्रमुख सहभागी झाले होते. या भव्य महल्ल्यामुळे परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

महल्ला पारंपरिक मार्गाने हल्ला बोल चौक (महावीर चौक) येथे पोहोचला. तेथे प्रथेनुसार अरदास करून युद्धकलेचे प्रतीकात्मक प्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर शोभायात्रा गुरुद्वारा बावली साहिबच्या दिशेने रवाना झाली. येथे भजन-कीर्तन झाल्यानंतर महल्ला पुढे गुरुद्वारा नगिना घाट साहिब येथे पोहोचला. तेथे पूजन आणि अरदास करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा तख्त साहिब येथे परतल्यानंतर या महल्ल्याची सांगता होणार आहे.

प्रशासक डॉ. स. विजय सतबीर सिंघ यांनी पुढे सांगितले की, या महल्ल्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे पंजाबमधून आलेली गुरु की लाडली फौज, विशेषतः निशान साहिबधारी निहंग सिंहांचे पथक, तसेच विविध दल-पंथांचे जत्थेदार, त्यांच्यासोबत सहभागी झालेले घोडे आणि हत्ती. या पारंपरिक सहभागामुळे महल्ल्याची भव्यता अधिकच वाढली.

या प्रसंगी प्रशासकांचे सल्लागार स. जसवंत सिंघ बॉबी, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक स. रविंदर सिंघ कपूर, सहायक अधीक्षक स. जैनल सिंघ डिल्ली, सहायक अधीक्षक स. बलविंदर सिंघ फौजी यांच्यासह गुरुद्वारा साहिबचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

घोडदौड व नेजाबाजीचे आयोजन

दसरा (महल्ला) उत्सवानिमित्त पंजाबमधून आलेल्या निहंग सिंहांच्या पथकांकडून बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी गुरुद्वारा बावली साहिबलगत असलेल्या गुरुद्वारा साहिबच्या खुल्या मैदानात घोडदौड आणि नेजाबाजीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे. या पारंपरिक शौर्यकलेचे प्रदर्शन पाहण्यासाठी भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *