क्राईम

सोशल मीडियावरील अनोळखी संपर्कांपासून सावध राहा; संशयास्पद संदेशांची माहिती पोलिसांना द्या

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांचे युवकांसह सर्व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

 

 

नांदेड : सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांशी संपर्क साधून त्यांना कथितरीत्या देशविघातक कारवायांकडे वळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे युवकांसह सर्व नागरिकांनी Instagram, WhatsApp, Facebook आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या संदेशांबाबत सतर्क राहावे, असे आवाहन नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी केले आहे.

काही महिन्यांपूर्वी शहजाद भट्टी याच्याशी संबंधित कथित नेटवर्कबाबत नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले होते. पाकिस्तानस्थित शहजाद भट्टी नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या काही तरुणांशी संपर्क साधला जात असल्याची माहिती समोर आली होती. अशा संपर्कांच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढून देशविघातक कृत्यांसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने शहजाद भट्टी नेटवर्कला बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम (UAPA) अंतर्गत दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील संशयास्पद संपर्कांकडे दुर्लक्ष न करता त्याबाबत योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.

नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी?

नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी, अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या संदेशाला प्रतिसाद देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची ओळख पडताळून पाहावी. स्वतःची वैयक्तिक माहिती, आर्थिक तपशील, पासवर्ड किंवा लोकेशन अनोळखी व्यक्तींशी शेअर करू नये. संशयास्पद लिंक उघडणे तसेच अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या फाइल्स किंवा अॅप्स डाउनलोड करणे टाळावे.

हिंसक, बेकायदेशीर किंवा देशविघातक कृत्यांसाठी प्रवृत्त करणारे संदेश अथवा प्रस्ताव प्राप्त झाल्यास संबंधित व्यक्तीशी पुढील संवाद साधू नये. अशा प्रकारचा संशयास्पद संपर्क आढळल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा नांदेड पोलिसांशी त्वरित संपर्क साधून माहिती द्यावी.

संशयास्पद संपर्क आल्यास घाबरू नका; पोलिसांना कळवा

अशा संपर्कात आलेल्या किंवा कोणत्याही संशयास्पद जाळ्यात अडकल्याची शक्यता वाटणाऱ्या युवकांनी घाबरून न जाता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. वेळेवर माहिती मिळाल्यास संबंधितांना योग्य ती मदत देणे आणि कायद्यानुसार आवश्यक कार्यवाही करणे शक्य होईल, असे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडियाचा वापर करताना सतर्कता बाळगा, अफवांपासून दूर राहा आणि संशयास्पद बाबींची माहिती त्वरित पोलिसांना द्या, असे आवाहन नांदेड पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *