सक्षम ताटे हत्याकांड : ॲड. संतोष छत्रपती भोसले यांच्या बाजू मांडणीनंतर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

नांदेड : नांदेड शहरातील बहुचर्चित सक्षम ताटे हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आरोपी जयश्री मदनसिंह ठाकूर ऊर्फ मामीडवार यांना जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. संतोष छत्रपती भोसले यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यांच्या युक्तिवादानंतर न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी जामिनाचा आदेश पारित केला.
या प्रकरणातील आरोपी जयश्री मामीडवार यांच्याविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६०/२०२५ नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, शस्त्रास्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमांनुसार आरोप नोंदविण्यात आले होते.
न्यायालयातील सुनावणीदरम्यान बचाव पक्षातर्फे ॲड. संतोष छत्रपती भोसले यांनी युक्तिवाद करताना आरोपी घटनेच्या वेळी घटनास्थळी उपस्थित नव्हत्या, तसेच त्यांच्याविरुद्ध कटात सहभाग असल्याचा आरोप असला तरी उपलब्ध आरोपपत्रातील पुरावे आणि मुलीच्या विविध जबाबांमध्ये विसंगती असल्याचा मुद्दा मांडला. केवळ मुलीच्या प्रेमसंबंधाला कुटुंबीयांचा विरोध होता, या कारणावरून आरोपीचा कथित गुन्ह्यातील सहभाग सिद्ध होत नाही, असा युक्तिवादही बचाव पक्षाने केला.
सरकारी पक्ष आणि माहितीदाराच्या वकिलांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जामिनास विरोध केला. मात्र, उपलब्ध पुराव्यांचे स्वरूप, आरोपी महिलेची भूमिका, जबाबांमधील विसंगती आणि खटला लवकर पूर्ण होण्याची शक्यता नसल्याची बाब विचारात घेऊन उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करण्याचा निर्णय घेतला.
या प्रकरणात ॲड. संतोष छत्रपती भोसले यांच्यासोबत ज्युनिअर ॲड. शितल क्षिरसागर (आगाशे) आणि ॲड. शुभम जिगळे यांनीही काम पाहिले.



