हिमायतनगरमध्ये डासांचा वाढता प्रादुर्भाव; औषध फवारणी व स्वच्छता मोहिमेची मागणी
रुग्ण हक्क संरक्षण समितीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन; यापूर्वी तीन वेळा निवेदने देऊनही कार्यवाही नसल्याचा आरोप

हिमायतनगर, जि. नांदेड : हिमायतनगर शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. डेंग्यू, मलेरिया व टायफॉईडसारख्या आजारांचा धोका लक्षात घेता शहरात तातडीने डास प्रतिबंधक औषध फवारणी आणि विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे हिमायतनगर शहराध्यक्ष शेख सलीम यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, शहरातील विविध भागांमध्ये डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, नागरिकांना घरात राहणेही कठीण होत आहे. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू, मलेरिया यांसह विविध संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. याचा सर्वाधिक त्रास लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या समस्येबाबत नगरपंचायत प्रशासनाला यापूर्वीही तीन वेळा लेखी निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, अद्याप डास प्रतिबंधक औषध फवारणीबाबत ठोस कार्यवाही झालेली दिसून येत नसल्याचा आरोप समितीने केला आहे.
हिमायतनगर शहरातील सर्व प्रभागांमध्ये तातडीने डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, नाल्या व गटारांची स्वच्छता करावी, पाणी साचणाऱ्या ठिकाणांची विशेष साफसफाई करून डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, तसेच नियमित अंतराने फवारणी करून संबंधित कामावर जबाबदार कर्मचाऱ्यांमार्फत देखरेख ठेवावी, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
नागरिक आजारी पडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने घेऊन तातडीने औषध फवारणी व स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी शेख सलीम यांनी केली आहे.



