नांदेडच्या बास्केटबॉल मैदानासाठी जिल्हा संघटनेचे निवेदन
सेमी इंडोर व अद्ययावत सिंथेटिक मैदानासाठी संदीप जोशी यांचे सकारात्मक आश्वासन

नांदेड : पुणे येथे आयोजित ४१ व्या राष्ट्रीय युवा बास्केटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. संदीपजी जोशी यांना नांदेड येथील क्रीडा संकुलातील बास्केटबॉल मैदान सेमी इंडोर व अद्ययावत सिंथेटिक करण्याबाबत जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील बास्केटबॉल खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, सरावासाठी आधुनिक मैदान मिळावे आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी खेळाडूंना अधिक चांगल्या प्रकारे तयारी करता यावी, या उद्देशाने हे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी संदीपजी जोशी यांनी सदर मैदानाच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका घेत, मा. मुख्यमंत्री यांच्या निधीतून मैदानाचे काम करून देण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल, तसेच यासंदर्भातील काम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
या आश्वासनामुळे नांदेडमधील बास्केटबॉल खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमध्ये आशा निर्माण झाली असून, मैदानाचे आधुनिकीकरण झाल्यास जिल्ह्यातील बास्केटबॉल खेळाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.



