शहर

सावित्रीच्या लेकींना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करणे काळाची गरज — सौ. अरुणा नरवाडे

नांदेड/प्रतिनिधी – थोर समाज सुधारक, राष्ट्रपिता महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाच्या उद्धारासाठी आपला देह झिजवल्यामुळे महिलाना शिक्षणाची संधी प्राप्त झाली आहे. याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी पालकांनी सावित्रीच्या लेकीना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोक शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ.अरूणा नरवाडे यांनी केल्या.

दीपक नगर तरोडा(बु ) भागातील श्रीनिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमाला व पालक मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ.अरुणा नरवाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्यात्या प्रा.सारिका बकवाड,आर.के निरपणे, भिक्षू माताजी ,सौ.सुरेखा वैद्य,सौ.क्रांती पोतरे,यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदी महापुरुषांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादनानंतर सतत तीन दिवस चालणाऱ्या व्याख्यानमालेचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आपण सर्व महिला या ठिकाणी उभे आहोत, महिला पालकांनी आपल्या मुलींना उच्चशिक्षित तर कराच पण सुसंस्कृतही बनवा हेच सावित्रीबाईला अपेक्षित असल्याचेही सौ.नरवाडे यांनी यावेळी म्हणाल्या. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डॉ.सौ.एस.एन.राऊत यांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी अनेक उपक्रम राबविल्यामुळेच आज या ठिकाणी अनेक विद्यार्थी इंग्रजीत भाषणासह विविध कला गुणदर्शनाने
उपस्थितांचे मने जिंकतात हे गतिमान शिक्षणाचे उदाहरण म्हणता येईल असे व्याख्यात्या प्रा.सौ.सारिका बकवाड यांनी म्हणून शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे कौतुक करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे महिलांच्या शिक्षणाविषयी असलेले विचार महिला- पालक व मुलींना कळावेत या उद्देशानेच गेल्या ३० वर्षांपूर्वी श्रीनिकेतन शाळेने व्याख्यानमाला सुरू केली याचा फायदा अनेक महिला-मुलींनी घेऊन उच्चशिक्षित झाल्याचेही प्रस्ताविकेतून मुख्याध्यापक यशवंत थोरात यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापिका डॉ.सौ.एस.एन. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मुलगी शिकलीच पाहिजे, सावित्रीबाई फुले यांच्या शाळेवर आलेला प्रसंग आदी नाटिकासह विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उपस्थितीतांना मंत्रमुग्ध केल्यामुळे पालकांची एकच गर्दी झाली होती. कार्यक्रमाचे सुरेख असे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षिका सौ. कांचन सोनकांबळे व सौ. कांचन घोटकेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहशिक्षक प्रल्हाद आयनेले यांनी मानले. कार्यक्रमास गायक आ.ग.ढवळे, जेष्ठ महिला पालक सौ.महागडे,सौ.कविता सरोदे ,सौ.साक्षी सावंत,सौ. अल्का सावंत,सौ.रेखा कांबळे,सौ आम्रपाली जोंधळे यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *