वाचन संकल्प महाराष्ट्राचा: विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वाचन संस्कृती रुजवणारा उपक्रम

दिनांक १ ते १५ जानेवारी २०२५ या दरम्यान महाराष्ट्रामध्ये “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आलेला आहे. यामध्ये विविध शिक्षण संस्था, शैक्षणिक ग्रंथालय, विशेष ग्रंथालय, सार्वजनिक ग्रंथालय व विविध शासकीय- निमशासकीय संस्था सक्रिय सहभाग घेऊन विविध उपक्रम राबविले आहेत.जसे की, ग्रंथ प्रदर्शन, सामूहिक वाचन, कथाकथन, निबंध स्पर्धा, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा, वाचन कार्यशाळा इ. अनेक वाचन संस्कृती वाढविणारे व जोपासणारे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
त्यामुळे आपण आपल्या कौटुंबिक व वैयक्तिक जीवनात देखील ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अनुषंगाने वाचन संस्कृतीचे महत्त्व लक्षात घेऊन आपल्या घरामधील लहान मुलांना मुलींना वाचन संस्कार करावेत. यामध्ये अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर वाचन साहित्याकडे विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांना प्रेरित करावे व किमान एक तास पुस्तक वाचण्यासाठी द्यावा अथवा पुस्तक वाचन घ्यावे. तसेच लहान मुलांची आवड लक्षात घेऊन त्यांच्या वयानुसार त्यांना छोटे, छोटे पुस्तके वाचण्यासाठी द्यावीत उदा. संत, महापुरुष व प्रेरणादायी व्यक्तिमत्व, विविध शास्त्रज्ञ यांचे चरित्र-आत्मचरित्र, बोधकथा कथा, विज्ञान कथा , विनोदी कथा, कविता संग्रह- कादंबरी तसेच अभ्यासक्रमा व्यतिरिक्त इतर वाचनसाहित्य वाचन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे आणि दिवसातून किमान एक तास वाचण्यासाठी द्यावा.
वाचनामुळे मानसिक स्वास्थ्य तंदुरुस्त राहते, नवनवीन घटना घडामोडी समजतात. जसे आपण शरीर मजबूत करण्यासाठी शारीरिक व्यायाम करतो तर मानसिक स्वास्थ्यासाठी भरपूर वाचन साहित्य वाचणे अत्यंत आवश्यक आहे. शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक स्वास्थ्य एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून तणावमुक्त जीवन जगण्यासाठी, आत्मविश्वास प्राप्तीसाठी आणि सकारात्मक विचारांची ऊर्जा मिळण्यासाठी वाचन एक प्रभावी माध्यम आहे. एकांतात पुस्तकासारखा सच्चा मित्र नाही, वाचनाने माणूस समृद्ध होतो म्हणूनच म्हटले जाते की वाचनाने मस्तक सशक्त बनते आणि सशक्त झालेले मस्तक कोणापुढे ही नतमस्तक होत नाही. अशी एवढी मोठी महिमा/ चमत्कारिक ऊर्जा वाचनाची आहे. म्हणून आपणास आवडणाऱ्या विषयापासून वाचनाची सुरुवात केल्यास नक्कीच वाचनाची आवड व सवय निर्माण होईल.
इंटरनेटच्या युगामध्ये वाचन संस्कृती लोप पावली जात आहे.
आजचा विद्यार्थी केवळ परीक्षार्थी बनत चाललेला आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थी पारंपारिक वाचनाकडे दुर्लक्ष करत आहे, त्यांचा जास्तीत जास्त वेळ अभ्यासक्रमाशी संबंधित वाचन साहित्य वाचनामध्ये जात आहे. त्यामुळे आठवड्यातून किमान एक दिवस तरी आपण अवांतर वाचण्यासाठी देणे अत्यंत आवश्यक झाले आहे आणि विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रोत्साहित देखील करणे काळाची गरज बनली आहे.
कारण विद्यार्थ्यांचा व पालकांचा खाजगी वेळ शक्यतो व्हाट्सअप, फेसबुक, इंटरनेट व इतर सोशल मीडिया तसेच टीव्ही पाहणे यामध्ये जात आहे. तसेच धावपळीच्या व स्पर्धेच्या आधुनिक युगामध्ये कौटुंबिक संवाद थोडाफार कमी झाला आहे यात दुमत देखील नाही. म्हणून कौटुंबिक संवाद व सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी वैयक्तिक पातळीवर देखील विशेष प्रयत्न करणे काळाची गरज बनलेली आहे. त्यापैकीच वाचन संस्कृती हा एक फार महत्त्वाचा भाग आहे. आजचा आधुनिक विद्यार्थी पारंपरिक वाचन संस्कृतीपासून दूर जात आहे आणि पुस्तक वाचनाचे आकर्षण कमी होत आहे असे वेळोवेळी लक्षात येते. त्यामुळे आपण पारंपारिक वाचन साहित्य जसे ग्रंथ, नियतकालिके वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून आपण सर्वांनीच पुस्तक, ग्रंथ वाचनाकडे वळले पाहिजे, दररोज किमान एक मराठी , इंग्रजी बातमीपत्र वाचले पाहिजे.
तसेच लहान मुलांच्या मानसिक व शारीरिक विकासासाठी पालकांनी विशेष लक्ष देण्याची काळाची गरज बनलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होण्यासाठी त्यांना पारंपारिक व मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करणे देखील आवश्यक आहे. तसेच पालकांनी विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार त्यांना जास्तीत जास्त वेळ द्यावा, विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, विद्यार्थ्यांना हसत खेळत अभ्यास करून घेण्याची जबाबदारी पालक व शिक्षकांची आहे. तसेच लहान मुलांना व मोठ्या मुलांना छोटी छोटी प्रेरणादायी पुस्तके वाचण्यासाठी देऊन त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. त्यामुळे त्यांचा मानसिक विकास करता येतो व वाचनाची आवड निर्माण करता येते. तरच खऱ्या अर्थाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजेल व ग्रंथ वाचनाची आवड निर्माण होईल असे वाटते. त्यामुळे सर्वांना वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच केवळ शैक्षणिक संस्थावर ही जबाबदारी सोपवून चालणार नाही तर सर्वांनी देखील वैयक्तिक पातळीवर वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सदरील अभिनव उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा ही सदिच्छा…
डॉ.राजीव किशनराव वाघमारे
ग्रंथपाल, नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज,नांदेड.



