नांदेडमध्ये जिल्हास्तरीय हॅकेथॉन स्पर्धा उत्साहात; विजेत्यांना स्मार्ट बक्षिसे, शिक्षकांचाही सन्मान

नांदेड, 15 फेब्रुवारी: जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड व अमेझॉन फ्युचर इंजिनिअर, लीडरशीप फॉर इक्विटी तसेच कोड टू एनहान्स लर्निंग या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे नुकताच जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन स्पर्धा व उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात डीआयईटीचे प्राचार्य सुदर्शन चिटकूलवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ. सविता बिरगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, लीडरशिप फॉर इक्विटीचे प्रकल्प व्यवस्थापक तुषार झा, कोड टू एनहान्स लर्निंग संस्थेचे वरिष्ठ व्यवस्थापक विशाल बोंबटकर आदींची उपस्थिती होती.

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केले. या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी स्क्रॅच प्लॅटफॉर्म वापरून गेम, ऍनिमेशन आणि अॅप्लिकेशन स्वरूपात विविध समस्या सोडवण्यासाठी प्रकल्प तयार केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देणाऱ्या या स्पर्धेत जि.प. उच्च माध्यमिक शाळा तामसा यांनी प्रथम क्रमांक, जि.प. उच्च प्राथमिक शाळा कुंडलवाडी यांनी द्वितीय क्रमांक आणि जि.प. उच्च प्राथमिक शाळा पानशेवाडी यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्या शाळांना 43 इंची एलईडी टीव्ही, टॅब, अलेक्सा, फिजिकल कम्प्युटिंग कीट आणि विद्यार्थी-शिक्षकांसाठी उपयुक्त पुस्तके बक्षीस म्हणून देण्यात आली. तसेच इतर 7 शाळांना 2 टॅब, अलेक्सा, सहायक पुस्तके आणि रोख बक्षिसे प्रदान करण्यात आली. या सोहळ्यात एकूण 23 टॅब, 10 अलेक्सा, 3 स्मार्ट टीव्ही आणि 3 सीएस कीट्स वाटप करण्यात आल्या. विशेष म्हणजे यावेळी जि.प. प्राथमिक शाळा खुटाळा शाळेची राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शिक्षकांचाही सन्मान
याच कार्यक्रमात कॉम्प्युटर सायन्स टीचिंग एक्सीलेंस (CSTE) कोर्समध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या 20 शिक्षकांचा गौरव करण्यात आला. एकूण 1381 शिक्षकांनी या कोर्ससाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 365 शिक्षकांनी यशस्वीरित्या कोर्स पूर्ण केला. या 20 उत्कृष्ट शिक्षकांना लॅपटॉप, टॅबलेट आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान आणि संगणकीय विचारशैली विकसित करण्याची संधी मिळाली. तसेच शिक्षकांना नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.



