घनकचरा व्यवस्थापनासाठी वाडी ग्रामपंचायतीत प्रकल्प उभारण्यात येणार मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची माहिती

नांदेड, 17- स्वच्छ भारत मिशन टप्पा-2 अंतर्गत नांदेड जिल्ह्यात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नांदेड तालुक्यातील वाडी ग्रामपंचायतीमध्ये लवकरच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दिली.
या प्रकल्पासाठी जिल्हा परिषदेच्या सेस मधून 28 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. घरगुती कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा केला जाणार आहे. नागरिकांनी घरातच ओला व सुका कचरा वेगळा करून घंटागाडीला द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. वाडी येथे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पात ओला व सुका कचरा विलगीकरण करून त्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रक्रिया केली जाणार आहे. ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाईल तर सुक्या कचऱ्यातून प्लास्टिक, कागद, लोखंड, काच यांसारख्या वस्तूंचे वर्गीकरण करून त्यांचा पुनर्वापरासह विक्री केली जाईल.
हा प्रकल्प केवळ वाडी ग्रामपंचायतीपुरता मर्यादित नसून वाघी व विष्णुपुरी ग्रामपंचायतींचा कचरा देखील येथे संकलित करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. या उपक्रमानंतर जिल्ह्यातील इतर तीन ग्रामपंचायतींमध्येही असेच प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या बजेटमध्ये तरतुद करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे गावांची स्वच्छ तर होतीलच परंतु त्याचबरोबर ग्रामपंचायतींना आर्थिक उत्पन्नाचाही एक नवा स्रोत उपलब्ध होणार आहे.
तसेच कचऱ्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट लावल्याने पर्यावरणपूरक व्यवस्थापन शक्य होणार आहे. हा प्रकल्प घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी सांगितले आहे.



