करिअरच्या संधी असंख्य असून त्या ओळखण्याची क्षमता आपल्यात असायला हवी- प्रा. डॉ तोळमारे

अर्धापूर:- उध्दव सरोदे –
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड येथे भूगोल विभागाच्या वतीने अतिथी व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या अतिथी व्याख्यानांतर्गत डॉ.शशिकांत तोळमारे यांनी भूगोलातील करिअरच्या संधी या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.टी.शिंदे होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून योगानंद स्वामी महाविद्यालय वसमत जि.हिंगोली भूगोल विषयाचे प्रा.डॉ.शशिकांत तोळमारे हे होते.
ते आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की विद्यार्थ्यांनी निःसंकोचपणे जिद्दीने यश आत्मसात करावे,प्रयत्नांची पराकाष्टा करून संधीचा शोध घ्यावा, छोट्या छोट्या गोष्टींतून मोठे उद्दिष्ट साध्य करावे कारण कर्तुत्वान माणसे आपल्या जीवनात प्रचंड मेहनत करतात अशा माणसांची आत्मचरित्रे वाचून प्रेरित व्हावे आणि सतत कार्य मग्न राहिल्यास यश हमखास मिळते. विद्यार्थ्यांनी आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण करून आवश्यक गोष्टीचं कौशल्य आत्मसात करावे आणि स्वावलंबी व्हावे,जीवनात यशस्वी होण्यासाठी चिंतन मनन निरीक्षण व आत्मपरीक्षण महत्त्वाचे असते कारण कोणत्याही महान व्यक्तीला मिळणारे यश हे सहजासहजी मिळत नसते तर त्यासाठी त्याने अहोरात्र मेहनत केलेली असते त्याचे फळ म्हणून आज त्याचे यश आपल्याला दिसते.
म्हणून जगातील सर्वात उंच इमारत तीच असते ज्या इमारतीचा पाया सर्वाधिक खोल असतो.म्हणून अवकाशामध्ये उंच वाढायचे असेल तर स्वतःला जमिनीमध्ये खोल गाढून घेणे गरजेचे असते.जी माणसे अभ्यासामध्ये स्वतःला खोल गाडून घेतात ती माणसे यशो शिखरावर आरुड होतात यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य परिश्रम मेहनत करून स्वतःला सिद्ध केले पाहिजे.माती सजीव असते कारण मातीमध्ये अनेक जिवाणू असतात मात्र मानवाने विविध केमिकलचा, औषधांचा, खतांचा वापर करून मातीला पूर्णता निर्जी्व बनवल आहे, म्हणून माती पोषक न राहता नापीक बनत चालली आहे, त्यामुळे आयुष्यभर कोणतेही व्यसन न करणाऱ्या व्यक्तीलाही कॅन्सर सारखे महा भयानक रोग होत आहेत आणि म्हणून माणसाचे जीवन दिवसेंदिवस धोक्यात येत आहे.
अशा परिस्थितीमध्ये मृदेची शुद्धता राखण्यासाठी मातीचे संवर्धन होणे गरजेचे आहे.मातीचे परीक्षण होणे गरजेचे असून मातीतील जैवविविधता जपणे गरजेचे आहे. इतर विषया प्रमाणे भूगोलामध्ये करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत आर्थिक भूगोल,सांस्कृतिक भूगोल कृषी, भूगोल वाणिज्य,भूगोल लष्करी, भूगोल वैद्यकीय,भूगोल वाहतूक भूगोल पर्यटन,भूगोल संसाधन अशा भूगोलाच्या अनेक शाखेच्या माध्यमातून करिअरच्या असंख्य संधी अवतीभोवती आहेत.याशिवाय शिक्षक,प्राध्यापक,संशोधक,पत्रकार कार्टोग्राफर,जैवविविधतज्ञ नकाशा तज्ञ,जीआयएस तज्ञ रिमोट सेन्सिंग तज्ञ सामाजिक विश्लेषण तज्ञ, लोकसंख्या तज्ञ,भूगर्भ तज्ञ,जलतज्ञ, वनतज्ञ,पर्जन्य तज्ञ,हवामान तज्ञ कल्चर तज्ञ,आपत्ती व्यवस्थापन तज्ञ, स्पर्धा परीक्षा तज्ञ,डाटा विश्लेषक तज्ञ सांख्यिकी तज्ञ,ग्लोबल वार्मिंग तज्ञ, प्रदूषण तज्ञ,अशा अनेक संधी उपलब्ध आहेत.भूगोलातील या करिअरच्या संधी जामिया मिलिया विद्यापीठ तसेच जे.एन.यु विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ,जीआयएस सेंटर हैदराबाद या ठिकाणी उपलब्ध आहेत.
म्हणून विद्यार्थ्यांनी सजगपणे जगाकडे पाहिल्यास त्यांना स्वकर्तुत्वावर भूगोलातील करिअरच्या अनेक संधी सहजपणे प्राप्त करता येऊ शकतात असे प्रतिपादन केले.डॉ. तोळमारे यांनी केले.यावेळी प्रा.डॉ. भागवत पस्तापुरे यांनी माती परीक्षण संदर्भात विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले तर प्रा.डॉ.नामदेव वाघमारे यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 च्या अनुषंगाने भूगोल विषयाची उपयुक्तता विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.शिंदे म्हणाले की, भूगोल हा विषय आधुनिक काळामध्ये सर्वच दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे विशेषतः सामाजिक शास्त्रामध्ये भूगोल या विषयाला अत्यंतिक महत्त्व असून स्पर्धा परीक्षेसाठी बहुतेक विद्यार्थी या विषयाला पसंती देतात.
आजचे प्रमुख व्याख्याते प्रा.शशिकांत तोळमारे यांच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल यात तीळ मात्र शंका नाही,त्यांच्या समृद्ध वाणी मधून लोकप्रबोधन घडून येते ही फार मोठी बाब आहे.येणाऱ्या काळात भूगोलाच्या विद्यार्थ्यांना अनेक करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहेत त्या आत्मसात करून स्वावलंबी व्हावे असे त्यांनी प्रतिपादन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ.आर.बी. कोटलवार यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.बालाजी जाधव यांनी करून आभार प्रा.डॉ.मारोती देशमुख यांनी मानले.या कार्यक्रमास महाविद्यालया तील प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



