नांदेडच्या जुन्या शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, नागरिकांचे रोजचे हाल

नांदेड, १५ मे २०२५ – जुन्या नांदेड शहरातील जुना गंज ते मन्सूर खान हवेली मार्गावरील रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णपणे खराब अवस्थेत आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक प्रवास करतात, मात्र मनपाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे.
कधी काळी या रस्त्याचे गटारी व रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात आले होते, पण त्यानंतर आजपर्यंत दुरुस्ती किंवा डांबरीकरणाचे कोणतेही काम झालेले नाही. परिणामी, या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे.
गटारातील साचलेले पाणी आणि डोंगरी रस्ते यामुळे या परिसरातील रहिवासी आणि पादचारी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नाल्यांमधील घाण पाणी रस्त्यावर साचते आणि त्यावरून चालणे म्हणजे दिव्य ठरते. त्यामुळे अपघात आणि आजारांच्या घटनाही वाढत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मते, मनपाकडून वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही. लोकप्रतिनिधींनी आणि नगरसेवकांनी केवळ आश्वासनांची पुंगी वाजवली, मात्र प्रत्यक्षात काहीच घडलेले नाही.
“दररोज कामावर जाताना चिखल, पाणी आणि खड्ड्यांतून वाट काढावी लागते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो. आम्हाला फक्त एक योग्य रस्ता हवा आहे,” असे स्थानिक रहिवासी संतप्तपणे सांगतात.
स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष का?
हा रस्ता केवळ जुन्या शहराशीच नव्हे, तर आसपासच्या भागांशीही जोडलेला असून, त्यामुळे वाहतुकीची व नागरिकांच्या दैनंदिन हालचालींसाठी महत्त्वपूर्ण आहे. अशा महत्त्वाच्या रस्त्याकडे मनपा आणि प्रशासनाने दुर्लक्ष का केले आहे, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत.
नागरिकांनी लवकरात लवकर रस्त्याची डागडुजी करून डांबरीकरण करावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा, येत्या काळात नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.



