विद्यार्थ्यांनी वसतिगृहात प्रवेश घेताना काळजीपूर्वक चौकशी करावी : महत्वाचा सल्ला

नांदेड : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी गाव सोडून शहरांमध्ये वसतिगृहात वास्तव्यासाठी येतात. मात्र, प्रवेश घेताना अनेक वेळा आवश्यक माहिती न घेता प्रवेश घेतल्यामुळे भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागते.वसतिगृहाचे पीक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे त्यांच्याकडून खोटे आश्वासन दिली जातात आणि सुविधांचा अभाव या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी वसतिगृह निवडताना संपूर्ण चौकशी करूनच प्रवेश घ्यावा, असा सल्ला शिक्षण प्रेमी व पालकाकडून दिला जात आहे.
वसतिगृहामध्ये मिळणाऱ्या सुविधा, भोजन व्यवस्था, सुरक्षा, स्वच्छता, पाणीपुरवठा, अभ्यासाची शांतता, तसेच इमारतीच्या भाडेतत्त्वावर असलेला अधिकृत कराराची मुदत कोणत्या तारखेपर्यंत आहे, तसेच घरमालकाचे व होस्टेल चालकाचे भांडण चालू आहे का ? याचीपण चौकशी थेट घरमालकाशी करावी . मालकीची स्थिती, परवाना, पालिकेची परवानगी , करभरणा इत्यादी बाबींची खात्री करणे आवश्यक आहे.
काही वसतिगृहे परवानगीशिवाय चालवली जात असल्याचे समोर आले आहे. बऱ्याच वस्तीगृहामध्ये विद्यार्थ्यांवर संपूर्ण नियंत्रण ठेवले जात नाही.अशा ठिकाणी कोणतीही अधिकृतता नसल्यामुळे अचानक वसतिगृह बंद होण्याची शक्यता असते,विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. ज्याचा फटका थेट विद्यार्थ्यांना बसतो.
विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना लेखी करार, पावत्यांची मागणी आणि नियमावलीची प्रत मिळवणेही आवश्यक आहे. तसेच, पालकांनीही मुलांच्या वसतिगृहाची प्रत्यक्ष पाहणी करावी.
सुविधा नसलेल्या किंवा अनधिकृत वसतिगृहांपासून सावध राहून, विश्वासार्ह आणि मान्यताप्राप्त वसतिगृहांमध्येच प्रवेश घेणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे.



