नांदेडच्या डॉ. नितेश घुंगरवार यांची पॅसिफ इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्मोलॉजी एंड सेल्फॉलॉजी, ओडिशा येथे व्हिजिटिंग प्राध्यापकपदी नियुक्ती

नांदेड : नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र तथा कॉस्मोलॉजी विषयातील युवा संशोधक डॉ. नितेश गंगाधरराव घुंगरवार यांची पॅसिफ इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्मोलॉजी अँड सेल्फोलॉजी (PICS), सागर, ओडिशा येथे व्हिजिटिंग प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. घुंगरवार यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील गणितीय शास्त्रे संकुलातून कॉस्मोलॉजी विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यांनी हे संशोधन विद्यापीठाचे कुलसचिव तथा प्रख्यात संशोधक प्रा. डॉ. ज्ञानेश्वर डी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले आहे.
त्यांचे संशोधन कार्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले असून त्यांनी जिनिव्हा विद्यापीठ (स्वित्झर्लंड), सोफिया विद्यापीठ (बल्गेरिया) आदी ठिकाणी आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन सादर केले आहे. तसेच किंग साऊद विद्यापीठ (सौदी अरेबिया), अरिस्टॉटल युनिव्हर्सिटी (ग्रीस) आणि RUDN युनिव्हर्सिटी (रशिया) येथील संशोधकांसोबत संयुक्त संशोधन करून नामांकित आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये संशोधन निबंध प्रकाशित केले आहेत.
कॉस्मोलॉजी विषयातील संशोधनासोबतच त्यांनी सेल्फोलॉजी या नव्या संशोधन क्षेत्रातही कार्य सुरू ठेवले आहे. या क्षेत्रातील जागतिक ख्यातीचे संशोधक व जगातील अव्वल दोन टक्के शास्त्रज्ञांमध्ये समावेश असलेले डॉ. शिबेश कुमार जॅस पॅसिफ यांच्या सहकार्याने ते संशोधन करत आहेत. त्यांच्या संशोधन व शैक्षणिक योगदानाची दखल घेऊन पॅसिफ इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्मोलॉजी अँड सेल्फोलॉजीने त्यांची व्हिजिटिंग प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली आहे.
या यशाबद्दल त्यांचे मार्गदर्शक प्रा. डॉ. ज्ञानेश्वर डी. पवार, प्राध्यापकवृंद, सहकारी संशोधक, घुंगरवार परिवार तसेच मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



