मिलत नगर, अब्बासी मशीदजवळ रस्त्याची दयनीय अवस्था – पावसामुळे नागरिकांचे हाल

नांदेड: (प्रतिनिधी) मिलत नगर येथील अब्बासी मशीदजवळ ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी केलेली खोदाई नागरिकांच्या त्रासाला कारणीभूत ठरत आहे. पावसाळा सुरु होताच रस्त्यांची चिखलाने भरलेली अवस्था नागरिकांना जीवघेणा त्रास देत आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, ड्रेनेज लाईनसाठी खोदकाम करण्यात आले असले तरी रस्त्यांची दुरुस्ती केलेली नाही. पावसामुळे पाणी साचून रस्त्यांवर चिखल झाला आहे. मुलांना शाळेत जाणे कठीण झाले असून, वयोवृद्धांसाठी चालणेही अशक्य झाले आहे.
या सर्व परिस्थितीसाठी ठेकेदार आणि महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. जर काम वेळेत पूर्ण केले गेले असते आणि रस्त्यांची योग्य दुरुस्ती केली गेली असती, तर आज या त्रासाला सामोरे जावे लागले नसते.
नागरिकांनी महापालिका प्रशासनाला तातडीने लक्ष देऊन ठेकेदाराला लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून स्थानिक नागरिकांना या त्रासातून दिलासा मिळू शकेल.



