शहर

छेडछाड रोखा, विद्यार्थीनींमध्ये विश्वास निर्माण करा!: आ.श्रीजया चव्हाण

 

नांदेड, दि. २० जून २०२५: पोलीस प्रशासनाने नांदेड शहरातील शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेसच्या परिसरात गस्त वाढवावी. जनजागृती मोहीम राबवून विद्यार्थीनींमध्ये विश्वास निर्माण करावा. सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये तक्रार नोंदविण्याचे दूरध्वनी क्रमांक दर्शनी भागात ठळकपणे लावावेत. छेडछाड होत असेल तर तक्रार करण्यासाठी विद्यार्थीनींना हिंमत द्यावी. त्यांच्या तक्रारींवर वेगाने चौकशी करून योग्य कारवाई करावी, अशी मागणी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी आज केली.

पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी भोकर विधानसभा मतदारसंघातील अनेक विषयांसह नांदेड शहर व जिल्ह्यातील काही मुद्द्यांकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी वाहतूक नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची आवश्यकता विषद करून शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातील दादागिरीच्या घटनांना आळा घालण्याची मागणी त्यांनी केली. या मागणीची तातडीने दखल घेत पोलीस प्रशासनाने आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, भोकर, हदगाव, देगलूर, कंधार, धर्माबाद, मुखेड आदी तालुक्यांमध्ये १० दिवसांपूर्वीच्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक व इतर शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत करण्याची मागणी त्यांनी केली. पंचनामे वेगाने पूर्ण केल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे आभार मानले. स्वयंचलित हवामान केंद्रांबाबत शेतकरी शंका व्यक्त करत असून, ही केंद्रे व्यवस्थित काम करत आहेत की नाही, याची तपासणी करण्याचीही मागणी आ. श्रीजया चव्हाण यांनी केली.

भोकर, अर्धापूर व मुदखेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांसाठी नवीन वर्गखोल्या बांधकाम, जुन्या खोल्यांची दुरुस्ती, स्वच्छतागृहे, शाळांना संरक्षण भींती, स्वयंपाक गृह, भोजन व्यवस्थेची जागा, डेस्क-बेंच, संगणक व इंटरनेट सुविधेसह डिजिटल रुम, ग्रंथालय, अभ्यासिका, सीसीटीव्ही, आवश्यकतेप्रमाणे शिक्षक व शिक्षतेकर कर्मचाऱ्यांची उपलब्धता तसेच शाळेच्या जवळपास डीपी असेल तर त्याला तारेचे कुंपण करावे, अशी मागणी आ. श्रीजया चव्हाण यांनी या बैठकीत केली.

मुदखेड तालुक्यातील पार्डी वैजापूर येथील दत्त मंदीर, भोकर तालुक्यातील कांडली येथील महादेव मंदीर व अर्धापूर तालुक्यातील पाटणूर येथील अपरंपार महादेव मंदिर व परिसराच्या विकासासाठी निधी देणे, भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात २ नवीन डायलेसीस मशीनची उपलब्धता, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रावर निर्माण होणाऱ्या वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची व्यवस्था, विजेच्या तक्रारींचे गतीमान निराकरण, राज्य रस्ते परिवहन मंडळाच्या फेऱ्या व सुविधा वाढवणे, लष्कर व पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी रनिंग ट्रॅक, शासकीय इमारतींमध्ये रेन हार्वेस्टिंग व सोलर पॅनलची व्यवस्था करणे आदी मागण्या आ. श्रीजया चव्हाण यांनी यावेळी मांडल्या.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *