Street light on Degloor Naka Road देगलूर नाका ते बर्खी चौक रस्त्यावर अखेर दिवे लागले! अडीच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर नागरिकांनी घेतला सुटकेचा निश्वास
नांदेड, २८ जून: देगलूर नाका ते बर्खी चौक या मुख्य मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे गेल्या अडीच वर्षांपासून बंद असलेल्या स्ट्रीट लाइट्स अखेर आज नवीन खांब बसवून पुन्हा सुरू करण्यात आल्या. या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य होते, त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
या काळात अंधाराचा फायदा घेत चोरी, पाकीटमारी, मुलींशी छेडछाड, अपघात, तसेच एका अर्धखुनाचा प्रकार देखील घडल्याची माहिती समोर आली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी विशेषतः रात्रीच्या वेळेस याच रस्त्यावरून ये-जा करताना भीतीने भरलेले दिवस घालवले.
पण आज अखेर, महानगरपालिकेच्या वतीने नवीन स्ट्रीट लाइट्सचे खांब बसवून लाईन सुरु करण्यात आली, आणि रस्ता उजळून निघाला. अंधाराने गांजलेल्या नागरिकांनी आता सुटकेचा निश्वास घेतला आहे.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणाले, “अडीच वर्षे आम्ही अंधारात राहत होतो. केवळ दिवे नव्हते असे नाही, तर सुरक्षिततेचा पूर्ण अभाव होता. आज दिवे लागल्यावर खरं समाधान मिळालं आहे.”
हा रस्ता शहरातील एक महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग आहे. अनेक विद्यार्थी, कर्मचारी आणि सामान्य नागरिक याच मार्गाने दररोज ये-जा करतात. त्यामुळे स्ट्रीट लाइट्स बंद असणे म्हणजे त्यांची सुरक्षितता धोक्यात टाकणेच होते.
नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानत असेही आवाहन केले की, “आता तरी या लाईट्सच्या देखभालीकडे वेळोवेळी लक्ष दिले जावे, जेणेकरून पुन्हा असे अंधाराचे दिवस पाहायला लागू नयेत.”



