महाराष्ट्रा

नांदेडमध्ये भव्य तृतीयपंथीय ओळखपत्र वाटप समारंभ व लिंग संवेदना कार्यशाळा संपन्न

 

नांदेड (प्रतिनिधी) – “तृतीयपंथीयांना समानतेने वागणूक मिळावी, हा केवळ हक्काचा विषय नाही तर संवेदनशीलतेचा आणि मानवी अधिकारांचा भाग आहे. समाजाच्या मनात स्वीकाराचं वातावरण निर्माण झालं, तर तृतीयपंथीयांचा प्रवास भिकेपासून सन्मानाकडे होऊ शकतो,” असे उद्गार डॉ. सान्वी जेठवाणी (सह-उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय हक्क व कल्याण मंडळ) यांनी काढले.

दि. ९ जुलै २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन नांदेड, महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण व कल्याण मंडळ व सप्तरंग सेवाभावी संस्था नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ‘तृतीयपंथीय ओळखपत्र वाटप समारंभ व लिंग संवेदना व लिंग जागरूकता कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मा. श्री. राहुल कार्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी मा. किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी श्री. सचिन खल्लाळ, समाज कल्याण निरीक्षक श्री. कदम, डॉ. सान्वी जेठवाणी, तसेच जिल्हा प्रशासनातील विविध अधिकारी, महानगरपालिका, जिल्हा परिषदेचे कर्मचारी आणि एकूण २०० हून अधिक उपस्थितांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी मा. राहुल कार्डिले म्हणाले, “समाजातील प्रत्येक घटकाचा विकास हा प्रशासनाचा उद्देश आहे. तृतीयपंथीय हे समाजाचा अविभाज्य भाग असून, त्यांचा समावेश हा संविधानिक हक्क आहे. जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही तृतीयपंथीय समुदायासाठी सदैव सकारात्मक आहोत.”

कार्यक्रमात ‘तृतीयपंथीयांचा इतिहास, त्यांचं आजचं वास्तव आणि उद्याची दिशा’ या विषयावर डॉ. सान्वी जेठवाणी यांचे सखोल सादरीकरण झाले. त्यांनी सांगितले की, “इतिहासात राजदरबारांमध्ये तृतीयपंथीयांना मानाचे स्थान होते. ते गुप्तहेर, नर्तक, रक्षणकर्ता, शिक्षक या भूमिकेत होते. पण ब्रिटिश काळात कायद्यांमधून त्यांना ‘क्रिमिनल ट्राइब’ घोषित करण्यात आलं आणि त्यानंतर समाजाने त्यांच्यावरचे दरवाजे बंद केले. आजची भीक मागणारी प्रतिमा ही त्यांच्या निवडीची नाही, ती परिस्थितीने निर्माण केलेली आहे.”

त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकताना सांगितले की –

“आजही अनेक तृतीयपंथीयांना आरोग्य सुविधा, शिक्षण, नोकरी यासाठी संघर्ष करावा लागतो.”

“पोलीस खात्याचे नोंदपत्र बदलणे, आरोग्य विमा योजनांचा लाभ घेता न येणे, सरकारी योजनांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रं नसणे – हे गंभीर प्रश्न आहेत.”

“अनेक वेळा तृतीयपंथीयांना त्यांच्या लिंग ओळखीवरून सरकारी कार्यालयांतही अपमानास्पद वागणूक मिळते. ही मानसिक हिंसा थांबायला हवी.”

 

या कार्यक्रमात ‘द हमसफर ट्रस्ट, मुंबई’ संस्थेच्या निलोफर आणि आशू यांनी ‘LGBTQIA+ समुदाय’ व ‘कुटुंबीय स्वीकाराचे महत्त्व’ या विषयांवर सादरीकरण करताना सांगितले की, “समाजातील भेदभावाचा प्रारंभ कुटुंबातून होतो आणि परिवर्तनाची सुरुवातही तिथूनच होते.” त्यांनी तृतीयपंथीयांवर होणाऱ्या मानसिक अत्याचार, शारीरिक हिंसा आणि सामाजिक बहिष्कार यावरही प्रकाश टाकला.

या कार्यक्रमात ५० तृतीयपंथीयांना अधिकृत ओळखपत्रांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मीना सोलापूरे यांनी सहज आणि प्रभावीपणे केले. त्यानंतर 10 जुलै 2025 रोजी पोलीस जिल्हा अधीक्षक कार्यालय मध्ये पोलीस अंमलदार व विविध पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांसाठी देखील लिंग संवेदनशीलता व कायदा सुव्यवस्था तृतीयपथांविषयी मार्गदर्शन करण्यात आलं यावेळेस अनेक आयपीसी धारा ज्या तृतीयपंथांसाठी लाभार्थी ठरू शकतात व तृतीय पंथ यांचे समस्या पोलीस ठाण्यात कशा पद्धतीने सांभाळायच्या याबद्दल मार्गदर्शन डॉ. सान्वी जेठवाणी यांनी केले.

अशा कार्यशाळा केवळ माहितीपुरत्या न राहता, समाजमनात बदल घडवणाऱ्या ठरतात. तृतीयपंथीयांसाठी समान संधी, सन्मान आणि न्याय मिळवण्यासाठी या कार्यशाळांचे आयोजन अधिक प्रमाणात जिल्हास्तरावर होणे गरजेचे आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *