माळटेकडी अंडरब्रिजमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प – महानगरपालिकेकडे तातडीने उपाययोजनांची मागणी

नांदेड | 10 जुलै 2025 – नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरातील माळटेकडी अंडरब्रिजमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतुकीची मोठी अडचण निर्माण झाली आहे. मुसळधार पावसात अंडरब्रिजमध्ये पाणी साचून रस्ता पूर्णपणे बंद होतो, परिणामी वाहनचालक व पादचाऱ्यांना पर्यायी मार्ग नसल्याने प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत.
या समस्येबाबत शहराध्यक्ष शेख रऊफ जमीनदार यांनी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन सादर करून तातडीने पाणी उपसण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, “माळटेकडी अंडरब्रिज हा वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून, पावसाच्या दिवसात येथे सातत्याने पाणी साचते. त्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडणे, शाळकरी मुले, रुग्ण व प्रवासी यांना स्थलांतर करणे अवघड होते.”
या परिसरात कोणताही वैकल्पिक रस्ता उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेख रऊफ यांनी महानगरपालिकेने संपूर्ण हंगामासाठी जलनिकासी व पंपिंग व्यवस्था ठेवल्याशिवाय अडचणी वाढतील, असा इशारा दिला आहे.
नागरिकांकडूनही नाराजीचा सूर उमटत असून, सोशल मिडियावर या समस्येचा मुद्दा उचलला जात आहे. आता महानगरपालिकेने या तक्रारीची गंभीर दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.



