देगलूर नाका परिसरातील हॉटेल्स, चहा व पानटपऱ्यांवर रात्रीची गर्दी; कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

नांदेड | प्रतिनिधी – नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरातील हॉटेल्स, चहा टपऱ्या आणि पानटपऱ्या हे व्यवसाय रात्रभर सुरू ठेवण्यात येत असल्यामुळे त्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या आस्थापनांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक येथे मोठ्या संख्येने जमू लागले असून भविष्यात एखादी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरातील नागरिक व स्थानिक नेते शेख रऊफ जमीनदार (शहराध्यक्ष) यांनी या मुद्द्यावर महापालिका आयुक्तांना निवेदन दिले असून, संबंधित व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे – देगलूर नाका परिसर हा एक अत्यंत गजबजलेला आणि वाहतूक भार असलेला परिसर आहे. या परिसरात रात्रभर सुरू असलेल्या हॉटेल्स, चहा व पानटपऱ्या यामुळे नशा केलेले व संशयास्पद हालचाली करणारे लोक इथे थांबत आहेत. त्यामुळे परिसरातील शांतता भंग होण्याबरोबरच स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे.
शेख रऊफ यांनी म्हटले आहे की, “रात्रभर सुरू राहणाऱ्या आस्थापनांमुळे समाजविघातक घटकांना मिळणारी पोषक जमीन थांबवण्यासाठी तात्काळ कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात एखादी अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर येईल.”
या पार्श्वभूमीवर त्यांनी महापालिकेकडे मागणी केली आहे की, रात्री उशिरापर्यंत चालू असलेल्या आस्थापनांवर बंदी आणावी व आवश्यक त्या व्यावसायिकांवर कारवाई करून कायदा व सुव्यवस्था राखावी.
प्रशासनाकडून या निवेदनावर काय निर्णय घेतला जातो, याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले आहे.



