वॉर्ड क्र. १२ मध्ये विकासकामांना गती; हैदराबाद रोड ते बायपास रस्त्याच्या शिव रोडच्या कामाचा शुभारंभ

(मुनवर खान)
नांदेड, दि. ६ ऑगस्ट – नांदेड शहरातील वॉर्ड क्र. १२ मध्ये २०२१ मध्ये मंजूर झालेल्या मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत हैदराबाद रोड येथील पाकिजा फॅशन हॉल पासून ते बायपास रोडपर्यंतच्या शिव रोड विकासकामाची सुरुवात करण्यात आली. या कामाचा शुभारंभ हाफेझ वाजिद साहेब यांच्या दुआने करण्यात आला.
या कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय व नागरिकांच्या उपस्थितीमुळे विशेष महत्त्व लाभले. या वेळी हाफेझ अब्दुल रहीम, माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी उपमहापौर अब्दुल गफ्फार, माजी नगरसेवक जावीद चाऊस, मियां भाई, सय्यद भाई, शकील भाई गुतेदार, निवृत्त अधिकारी अब्दुल रहीम यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिव रोडचे हे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. स्थानिक नागरीकांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर अखेर या विकासकामाला मंजुरी मिळाली आणि आता प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. या रस्त्याचा पूर्ण होणे म्हणजे वॉर्डातील रहिवाशांना सुरक्षित आणि दर्जेदार वाहतुकीचा मार्ग उपलब्ध होणार आहे.
माजी लोकप्रतिनिधींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “वॉर्ड क्र. १२ मध्ये राहणाऱ्या नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधांची नितांत गरज आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर परिसराच्या विकासास चालना मिळेल.”
नागरिकांनी ही कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याची मागणी केली असून, संबंधित यंत्रणांनी वेळोवेळी देखरेख करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.



