NIDC-नांदेड औद्योगिक विकास परिषद कार्यालयाचे भव्य उद्घाटन

नांदेड : आज दिनांक 15 ऑगस्ट 2015 रोजी स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने नांदेड औद्योगिक विकास परिषद (NIDC) या सेवानिवृत्त उद्योग खाते अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालयाचे भव्य उद्घाटन करण्यात आले. मालेगाव रोडवरील मनी ऑईक शोरूम आंग्लस येथे या कार्यालयाचे रितसर उद्घाटन झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रविण देशमुख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अमोल इंगळे (अधिक्षक उद्योग अधिकारी, नांदेड), श्री. बी. जी. सोनकांबळे (आग्रणी बँक व्यवस्थापक), श्री. आनंद विडवई (अध्यक्ष लघुउद्योग भारती), श्री. महरणवार (सहसंचालक, मराठवाडा वैद्यनिक विकास मंडळ) तसेच नामांकित उद्योजक श्री. के. मुरली उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. आर. गजभारे यांनी केले. यावेळी आग्रणी बँक व्यवस्थापकांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. अधिक्षक उद्योग अधिकारी श्री. इंगळे यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ उद्योग व उद्योजकांना मिळवून देण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आश्वासन व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात श्री. प्रविण देशमुख यांनी सांगितले की, “संस्थेचे अधिकारी आणि सदस्य यांना दीर्घकाळाचा औद्योगिक अनुभव आहे. या अनुभवाचा उपयोग नवउद्योजक, सुशिक्षित बेरोजगार व लघुउद्योगांना निश्चितच होईल. नांदेड जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात NIDC महत्त्वाची भूमिका बजावेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्रीराम चैनपूरे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजी देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. भोपाळ, श्री. सोनकांबळे, श्री. तोबणे, श्री. जाधव, श्री. चितळवार आदींनी विशेष परिश्रम घेतले.
या उद्घाटन सोहळ्यामुळे नांदेड जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



