लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या जिव्हाळ्याचा विषय – खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण यांची पूरग्रस्त भागात पाहणी

नांदेड.दि. १८ लेंडी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न हा अनेक वर्षांपासून प्रलंबित असून या भागातील लोकांच्या जीवनाशी जोडलेला जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील परिस्थिती गंभीर झाली असून लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरला आहे. मुसळधार पावसामुळे प्रकल्पग्रस्तातील अनेक गावे जलमय झाली आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पूरस्थितीची माहिती मिळताच खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण साहेबांनी तातडीने पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, वेदना आणि भावना जाणून घेतल्या. या वेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश दिले. पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचविणे, जनावरांच्या चाऱ्याची व पिण्याच्या पाण्याची सोय करणे तसेच शेतीचे झालेले नुकसान तातडीने मोजून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे आदेशही खासदार चव्हाण यांनी दिले.
या पाहणी दौऱ्यात माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्यासह परिसरातील शेतकरी, गावकरी आणि पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी या वेळी आपल्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्या व लेंडी प्रकल्पासंबंधीचे प्रश्न खासदारांसमोर मांडले.
ग्रामस्थांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा, योग्य पुनर्वसन व्हावे तसेच अशा प्रकारच्या आपत्तीस्थितीत कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. खासदार चव्हाण यांनी या सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील, असा विश्वास व्यक्त केला.

लेंडी प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित विषय असून या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न जितक्या लवकर मार्गी लागेल तितके चांगले, असे मत स्थानिक नागरिक व शेतकरी वर्गातून व्यक्त केले जात आहे.

