शहर
जुनागंज येथील असलम मेडिकलला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग – लाखो रुपयांचे औषधसामान जळून खाक

नांदेड : शहरातील जुनागंज परिसरात मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास असलम मेडिकल या औषध दुकानाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे औषधसामान जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या तत्परतेमुळे आग शेजारील दुकानांमध्ये पसरली नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दुकानाचे मालक मोहम्मद असलम यांनी सांगितले की, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असून मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.



