अतिवृष्टीत पूरग्रस्तांच्या मदतीला समाजसेवक व उद्योजक धावले-दिलीप ठाकूर व सतीश शर्मा यांच्या पुढाकाराने शेकडो नागरिकांना अन्नदान

नांदेड – मध्यरात्रीनंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड शहरातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून शेकडो घरांमध्ये पाणी शिरले आहे. या भीषण परिस्थितीत नागरिक अडचणीत असताना सर्वात आधी ज्येष्ठ समाजसेवक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व प्रसिद्ध उद्योजक सतीश सुगनचंदजी शर्मा** यांच्या पुढाकाराने पूरग्रस्तांच्या मदतीला हातभार लागला.
शुक्रवारी दुपारी बारा वाजल्यापासून पूरग्रस्तांना गरमागरम जेवण वाटप सुरू करण्यात आले. पूर ओसरेपर्यंत दानशूर नागरिकांच्या मदतीने लायन्स क्लबच्या वतीने डबा वाटप सुरू राहील, अशी माहिती संयोजक दिलीप ठाकूर यांनी दिली.
या उपक्रमाआधी दिलीप ठाकूर यांनी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांच्याशी संपर्क साधून पाणी शिरलेल्या भागांची माहिती घेतली. त्यानंतर दिलीप ठाकूर, सतीश सुगनचंदजी शर्मा, सुरेश शर्मा, शिवा लोट, प्रसाद देशपांडे, जनार्दन वाकोडीकर, पावडे मामा आदींनी गुडघाभर पाण्यात उतरून थेट पूरग्रस्तांच्या घरी जाऊन जेवण पोहोचवले. दुपारी चार वाजेपर्यंत शेकडो नागरिकांपर्यंत अन्न पोहोचविण्यात आले.
श्रावस्ती नगर व शहरातील इतर सखल वस्त्यांमध्ये नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला. या उपक्रमात भाजपा नांदेड महानगर, लायन्स परिवार, अमरनाथ यात्रि संघ** यांचाही सहभाग असून हा उपक्रम माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, मराठवाडा संघटन मंत्री संजय कोडगे, महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर, जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, ॲड. किशोर देशमुख, लायन्स उपप्रांतपाल योगेश जायस्वाल व पूर्व प्रांतपाल दिलीप मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
पूरग्रस्तांना अन्नदान करण्यासाठी इच्छुक दानशूर नागरिकांनी ॲड. दिलीप ठाकूर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
छायाचित्र : जनार्दन वाकोडीकर



