दशिंग पोलिस अधिकाऱ्याचा समाजासाठी मोलाचा निर्णय
नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांचा आदर्श उपक्रम : एका महिन्याचा पगार पुरग्रस्तांसाठी

नांदेड : संकटाच्या काळात खरी समाजाभिमुखता कोणती याचे उत्तम उदाहरण नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी दाखवून दिले आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टी, ओला दुष्काळ आणि पुरस्थितीमुळे शेतकरी बांधवांवर आणि सर्वसामान्य जनतेवर संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर चिंचोलकर यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत, स्वतःचा एक महिन्याचा पगार – अंदाजे एक लाख रुपये – पुरग्रस्तांसाठी आर्थिक मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे.
चिंचोलकर यांचा हा उपक्रम केवळ मदत नसून, समाजाप्रती असलेल्या जबाबदारीचे भक्कम दर्शन घडवणारा आहे. स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना शेतकऱ्यांची वेदना किती तीव्र असते याची पूर्ण जाण आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एका पुरग्रस्त गावाचे ते रहिवासी असल्याने शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या व्यथा त्यांनी जवळून पाहिलेल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्या या निर्णयाला केवळ औपचारिकतेपेक्षा अधिक ‘हृदयस्पर्शी’ भावनेची किनार लाभली आहे.
“नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिस ही केवळ कायदा-सुव्यवस्था पाहणारी यंत्रणा नसून ती समाजातील अविभाज्य घटक आहे, हे लक्षात घेऊन मी माझा पगार पुरग्रस्तांसाठी देत आहे,” असे निवेदन चिंचोलकर यांनी आपल्या अहवालात केले आहे.
त्यांनी दिलेला निधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन निधी, एनजीओ किंवा पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून योग्य ठिकाणी पोहोचवावा अशी विनंती मा. पोलीस अधीक्षक यांना त्यांनी सादर केली आहे. त्यामुळे या मदतीचा लाभ प्रत्यक्ष पीडितांना मिळणार आहे.
चिंचोलकर यांचा हा निर्णय समाजात एक आदर्श निर्माण करणारा ठरत असून, संकटाच्या काळात “पोलिस फक्त वर्दीतील शिस्तप्रिय अधिकारी नाहीत, तर समाजाचे खरे सेवक आहेत” हा विश्वास अधिक दृढ करणारा ठरला आहे.

