बाबाजानी दुराणी यांची परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी निवड

परभणी : परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी झालेल्या नवीन नियुक्तीमुळे जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पदावर नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वरिष्ठ उपाध्यक्ष गणेशराव पाटील यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
नियुक्तीनंतर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, “काही काळापूर्वी मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि जिल्हाभरातील जुन्या पदाधिकाऱ्यांना एकत्र करून संघटन मजबूत करण्याचे काम हाती घेतले. पक्षाचा पाया पुन्हा मजबूत करण्यासाठी आम्ही सर्व सहकारी नव्या जोमाने सज्ज आहोत. या पार्श्वभूमीवर मिळालेली ही जबाबदारी आमच्या तळमळीला नवे पंख देणारी आहे.”
ते पुढे म्हणाले की, “आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये परभणी जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला दैदिप्यमान यश मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वशक्तीनिशी प्रयत्नशील राहू. जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि निष्क्रिय सरकारला धारेवर धरण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू.”
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना अभिवादन करत त्यांनी सांगितले की, “पक्षाने दिलेली जबाबदारी कर्तव्य समजून पार पाडणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, तसेच रमेश चेन्नीथला यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची वाटचाल अधिक समर्पणाने पुढे नेऊ.”
शेवटी त्यांनी पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.



