लग्नाच्या काही दिवसांपूर्वीच काळाने खेचला हात – मलकापूरच्या CA खुशबू परयाणीचा मुंबईत अपघाती मृत्यू


मलकापूर (बुलढाणा) – “१२ फेब्रुवारी रोजी शुभमुहूर्त ठरलेला होता, घरी लग्नाची लगबग सुरू होती, पाहुण्यांची यादी, साडी-श्रृंगाराची तयारी, आणि… एकच क्षण सगळं उध्वस्त करून गेला.”
मलकापूर शहरातील २७ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट खुशबू परयाणी हिचा मुंबईतील बीकेसी परिसरात भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. आयसीआयसीआय बँकेच्या मुंबई शाखेत कार्यरत असलेली खुशबू ६ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे कामावर निघाली होती. परंतु एशियन हार्ट हॉस्पिटल जंक्शनजवळ रस्ता ओलांडताना भरधाव पाण्याच्या टँकरने तिच्या गाडीवर जोरदार धडक दिली.
अपघात इतका भीषण होता की, सहकाऱ्यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
फक्त काहीच दिवसांनी तिचं लग्न होणार होतं -१२ फेब्रुवारीला. घरात आनंदाचे वातावरण होतं; मात्र नियतीनेच काळाचा डाव उलटवला. परयाणी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मलकापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

खुशबू ही स्थानिक समाजसेवक व व्यापारी ताराचंद परयाणी यांचे पुतणे दीपक परयाणी यांची कन्या होती. तिच्या अकाली निधनाने व्यावसायिक वर्तुळासह सर्व समाजमन व्यथित झाले आहे.
ही दुर्घटना पुन्हा एकदा शहरातील रस्त्यांवरील वेग आणि निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण करते. कामाच्या गडबडीत जीवाची किंमत विसरणाऱ्या आपल्या सगळ्यांसाठी हा प्रसंग गंभीर इशारा आहे -“वेळेवर पोहोचण्यापेक्षा सुरक्षित पोहोचणं महत्त्वाचं आहे.”



