“परभणीतील वक्फ संस्थांची नोंद उमेद पोर्टलवर करण्याचा मनोदय”


परभणी – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा, वक्फ मंडळाच्या सदस्या तथा राज्यसभा सदस्या खा. डॉ. फौजिया खान यांनी परभणी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील सर्व वक्फ संस्थांची नोंद व माहिती ‘उमेद’ पोर्टलवर अपलोड करण्याचा मनोदय व्यक्त केला. यासाठी लवकरच मुतवल्लींसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
डॉ. खान म्हणाल्या की, केंद्र सरकारने वक्फ अधिनियम 1995 मध्ये केलेल्या सुधारणांना पक्षाने विरोध दर्शवला होता; मात्र सत्ताधारी पक्षाने हा विरोध जाणीवपूर्वक दुर्लक्षित केला. नव्या सुधारित कायद्यानुसार सर्व वक्फ संस्थांची नोंद 5 डिसेंबर 2025 पर्यंत ‘उमेद’ पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. ही कालमर्यादा अत्यंत कमी असल्याने ती वाढविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्ह्यातील वक्फ संस्थांची नोंदणी प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत सुमारे 600 ते 700 संस्थांची माहिती पोर्टलवर अपलोड झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र मोठे काम अद्याप शिल्लक असून माहिती भरताना मुतवल्लींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्या दूर करण्यासाठी आणि माहिती योग्य प्रकारे कशी भरावी यासाठी 25 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा वक्फ अधिकारी कार्यालय परिसरातील उस्मानिया मस्जिद येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

नोंदी अपलोड करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू करण्यात येणार असून केंद्र सरकारने या प्रक्रियेसाठी दिलेली मुदत वाढविणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. यासाठी लोकलढा उभारण्याची गरज असून आगामी संसद अधिवेशनात हा मुद्दा मांडण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खासदार डॉ. खान यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला अब्दुल माजिद, अब्दुल खालिद, रहेमान पठाण, दशरथ तुपसुंदर, वनिता चव्हाण, तहसीन अहमद खान यांसह अनेकजण उपस्थित होते.



