मनपा निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार; पक्षासाठी झटणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना संधी देणार – वंचित बहुजन आघाडीचा निर्धार

नांदेड | प्रतिनिधी / नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने लढणार असून, पक्षाच्या स्थापनेनंतर होणाऱ्या या पहिल्याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षासाठी सातत्याने झटणाऱ्या तरुण, निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचा ठाम निर्धार करण्यात आला आहे, अशी माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
महानगर निवडणूकपूर्व आढावा बैठकीनंतर आयोजित या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष फारुक अहमद, माजी निवडणूक समितीचे प्रशांत इंगोले, शिवा नरंगले, शाम कांबळे, महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष आकाश जोंधळे, युवक महानगराध्यक्ष राहुल सोनसळे, सुखासिंग टाक, महानगर महासचिव अमृत नरंगलकर, सम्यकचे राज्य प्रवक्ते कैलास वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना फारुक अहमद म्हणाले की, “नांदेडमध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवायचे असेल तर नवीन, तरुण आणि संवेदनशील नगरसेवक निवडून आणावे लागतील. जुन्या पिढीतल्या अनेक नगरसेवकांना गुत्तेदारी करण्याची सवय लागल्यामुळे शहरातील अनेक भाग आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असून, नागरी वस्त्या घाणीच्या आणि दुर्लक्षाच्या साम्राज्यात ढकलल्या गेल्या आहेत.”
तसेच भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण नांदेडमध्ये पुन्हा एकदा विविध राजकीय प्रयोग करून सेक्युलर मतांचे विभाजन करण्याचा ट्रॅप लावण्याची शक्यता असल्याचा इशारा देत फारुक अहमद म्हणाले, “नांदेडला या राजकीय सापळ्यातून मुक्त करण्याची संधी वंचित बहुजन आघाडी देऊ शकते. त्यामुळे मतांची विभागणी रोखा, धनशक्तीला पायबंद घाला आणि या निवडणुकीत सामान्य नागरिकांच्या बाजूने उभे राहा,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी स्पष्ट करण्यात आले की, भाजप वगळता इतर राजकीय पक्षांसोबत चर्चा सुरू असून, याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व राज्य समिती योग्य वेळी जाहीर करतील.
वंचित बहुजन आघाडी नांदेड शहरातील नागरिकांचे प्रश्न, तरुणांचे भवितव्य, स्वच्छता, पाणी, रस्ते व मूलभूत नागरी सुविधांसाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करण्यास सज्ज असून, येणारी मनपा निवडणूक ही परिवर्तनाची निवडणूक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



