धर्माबाद नगरपरिषद निवडणुकीत राडा; राज्यभर खळबळ

जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवालाची मागणी, गुन्हा दाखल करण्याचे संकेत
नांदेड : जिल्ह्यातील धर्माबाद नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान घडलेल्या गोंधळामुळे राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना एका मंगल कार्यालयात डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणातील प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
धर्माबाद नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र मतदानाच्या सुरुवातीपासूनच विविध घटनांमुळे वातावरण तणावपूर्ण झाले. धर्माबाद येथील ईनानी मंगल कार्यालयात काही मतदारांना जबरदस्तीने थांबवून ठेवल्याची बातमी माध्यमांत प्रसिद्ध झाली. माहिती मिळताच निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुरेखा स्वामी आणि पोलीस निरीक्षक सदाशिव बडीकर यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र प्रारंभी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगत प्रशासनाकडून सारवासारव करण्यात आली.
प्रत्यक्ष छायाचित्रण व नागरिकांच्या साक्षींनंतरही प्रशासनाने सुरुवातीला घटना नाकारल्याने संभ्रम निर्माण झाला. मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येताच सायंकाळपर्यंत ईनानी मंगल कार्यालयाच्या चालकाविरुद्ध जमावबंदी आदेश व आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या बदलत्या भूमिकेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे.
या घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्वतः धर्माबादला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान, धर्माबादमध्ये बोगस मतदानाचाही आरोप करण्यात आला. एका मतदान केंद्रावर तेलंगणातून आलेल्या मतदाराकडून बोगस मतदान होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यावेळी काही महिला कार्यकर्त्यांनी एका महिलेला पकडून मारहाण केल्याची घटना घडली. मात्र नंतर ती महिला स्थानिक मतदार असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात संबंधित महिला मतदारास मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडेही लक्ष वेधले जात आहे. तसेच या सर्व प्रकाराचे चित्रीकरण करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना पोलिसांकडून दमदाटी व अरेरावी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी घटनेची गंभीर दखल घेतल्याचे सांगितले. संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागविण्यात आला असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भूमिका अधिक ठाम असणे अपेक्षित होते, असे त्यांनी स्पष्ट केले. पैशांचे प्रलोभन देऊन नागरिकांना एकत्र करण्यात आल्याचे मान्य करतानाच, त्यांना प्रत्यक्ष डांबून ठेवले नसल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र एकूणच हा प्रकार गंभीर असल्याचे त्यांनी मान्य केले.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. समाज माध्यमावरील पोस्टमध्ये त्यांनी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह आमदारांच्या अंगरक्षकावर गंभीर आरोप केले आहेत. मतदारांना मंगल कार्यालयात डांबून ठेवण्याची घटना लोकशाहीसाठी घातक असल्याचे सांगत, निवडणूक आयोगाने याची नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
धर्माबादमधील या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले असून, अहवालानंतर पुढील कारवाई काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



